ओल्या दुष्काळाने घेतला शेतकऱ्याचा बळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड प्रतिनिधी । परतीच्या पावसाने राज्यभरात थैमान घातले. या पावसाने शेतीमालाचे मोठे नुकसान केले. नुकसान झालेल्या शेतमालाचा दाह आता शेतकऱ्यांचे आयुष्य उध्वस्त करताना दिसत आहे. बीडमधील एका शेतकऱ्याने आपल्या मुलीचे लग्न कसे करावे या नैराश्येतून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी उघडकीस आली.

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील रामा बापूराव शिंदे (वय ३७, रा. देवळा ता. वडवणी) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.  मागच्या पाच वर्षाच्या दुष्काळाशी दोन हात करत संसाराचा गाडा ओढणाऱ्या रामा शिंदे यांनी यावर्षी सात एकर जमीनीत कांदा व कापूस लावला होता. सुरुवातीला कमी पाऊस असल्याने पीक चांगल होत. याच पिकावर दिवाळी साजरी करून उन्हाळ्यात मुलीचे लग्न करायचं स्वप्न शिंदे यांनी पाहिलं होतं.

मात्र दिवाळीमध्ये झालेल्या अतिवृष्टीने रामा शिंदेसह अनेक शेतकर्‍यांच्या स्वप्नावर पाणी फेरले. हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतल्याच्या चिंतेतून त्यांनी मंगळवारी विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. गंभीर अवस्थेत असलेल्या शिंदे यांना नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्‍चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे.

Leave a Comment