सततच्या नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हिंगोली प्रतिनिधी ।  कळमनुरी तालुक्यातील चिखली येथील ३६ वर्षीय शेतक-याने सततच्या नापिकीला कंटाळून गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली. गणेश रामराव चव्हाण असं शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्या आत्महत्येनंतर गावावर शोककळा पसरली.

मयत चव्हाण अल्पभूधारक शेतकरी होते. मागील तीन वर्षापासून शेतात नापिकीच सुरू होती. त्यातच मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसानं शेतात लागवड केलेले सोयाबीन पिकाचे नुकसान केले. हातातोंडाशी आलेले पीक अवकाळी पावसाने वाहून गेल्यानं गणेश चव्हाण चिंताग्रत झाले होते. अशा विषण्ण मनस्थितीत चव्हाण घरामध्ये कोणाशीही बोलतही नव्हते.

सततच्या तणावाला कंटाळून चव्हाण यांनी १९ फेब्रुवारीला सकाळी ११ ते सायंकाळी ६.३० च्या दरम्यान आपल्या राहत्या घरात नायलोन दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरातील इतर सर्वजण बाहेरून आल्यानंतर गळफास घेतलेल्या अवस्थेत गणेश चव्हाण यांचा मृतदेह पाहून घरच्यांनी आक्रोश केला. सदर प्रकरणात राजकुमार चव्हाण यांनी आखाडा बाळापूर पोलिसात दिलेल्या माहितीवरून आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक हुंडेकर हे करीत आहेत.

Leave a Comment