कापूस विकेना! कर्ज कसे फेडणार? विवंचनेत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे

खरीप हंगामातील पेरणी तोंडावर आली आहे .घरचा कापूस ऑनलाइन नोंदणी करूनही घरातच पडून आहे, बँकेचे कर्ज डोक्यावर आहे, ते कसं फेडणार या चिंतेत परभणीत एका तरुण शेतकऱ्यांने मृत्यूला कवटाळल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली आहे.

जिल्ह्यातील मानवत तालुक्यात सावळी गावांमध्ये राहणारा तरुण शेतकरी राजेभाऊ ज्ञानोबा काळे (वय २५) याने टोकाची भूमिका घेत जीवन यात्रा संपवल्याची घटना शुक्रवार २९मे रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. मयत शेतकऱ्याच्या नावे सावळी गावातील गट क्रमांक पंधरा मध्ये ५६ गुंठे एवढी शेती असून मोठ्या भावाच्या नावे दहा एकर शेती आहे. या सर्व शेतातील कापूस विक्री विना घरात पडून आहे. शासकीय खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी सदरील शेतकऱ्यांनी केली होती .दरम्यान खरीप हंगाम अगदी तोंडावर आलाय .घरात कापूस पडून आहे. डोक्यावर बँकेचे कर्ज आता बी भरणं कसे करायचे? मागील काही दिवसापासून याच विवंचनेत हा शेतकरी असल्याचे दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान आज सकाळी मयत शेतकऱ्याने त्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे.

जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांनी कापूस खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे .परंतु कापूस खरेदी केंद्रावर घेण्यात येणाऱ्या वाहनावरून ,ही खरेदी आणखी किती महिने चालणार? असा प्रश्न तयार झाला आहे .त्यात पावसाळा एक आठवड्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे या मोसमात कापूस खरेदी होणार की नाही ?अशी चिंता सर्व शेतकऱ्यांना लागून राहिले आहे . दिरंगाईने होणाऱ्या कापूस खरेदी मुळेच आज एका शेतकऱ्यांचा बळी गेला !अशी चर्चा जिल्ह्यात होताना दिसून येत आहे. दरम्यान या तरुण शेतकऱ्यांच्या आत्महत्ये प्रकरणी मानवत पोलिस स्टेशनला आकस्मित मुत्युची नोंद करण्यात आलीयं .पुढील तपास पोलिस नाईक, एस.एन.आबुज करीत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment