औरंगाबाद । कोरड्या दुष्काळामुळं गेली काही वर्ष होरपळून निघालेल्या मराठवाड्यावर आता ओल्या दुष्काळाने थैमान घातलं आहे. राज्यासह मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये सध्या परतीच्या पावसाने चांगलाचं झोडपलं आहे. विशेषत: ग्रामीण भागात पावसाचा प्रचंड जोर आहे. त्यामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. या अस्मानी संकटामुळं हातातोंडाशी आलेले सोन्यासारखे पीक मातीमोल झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून आक्रोश करत आहेत. मराठवाड्यात यंदा नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच जास्त प्रमाणात पाऊस कोसळला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांत शेतकऱ्यांना व्यवस्थित पीक घेता आले नव्हते. यानंतरही शेतकऱ्यांनी उमेद न हारता दुबार-तिबार पेरणी गेली होती. पिकांनी तग धरल्यामुळे या मेहनतीचे चीजही होताना दिसत होते. मात्र, परतीच्या पावसाने शेतकऱ्यांची ही सर्व मेहनत पाण्यात घालवली आहे.
औरंगाबादमध्ये या शेतकऱ्यांनी मका, सोयाबीन आणि कपाशीचे पीक घेतले होते. परंतु, कालपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे. आम्ही काही दिवसांपूर्वी मक्याचे पीक घेतले. मात्र, बाजारात त्याला भाव नाही. यानंतर कपाशीचे पीक घ्यायला गेलो तर संपूर्ण शेतीच पाण्याखाली गेली. आता आम्ही जगायचे कसे, आमच्या मुलाबाळांचे शिक्षण कसे करायचे, असा सवाल एका उद्विग्न शेतकऱ्याने विचारला.
उस्मानाबादमध्ये पावासाचे तांडव पाझर तलाव फुटले
उस्मानाबाद जिल्ह्यात पावसांनंतर पुराचा हाहाकार समोर आला असून दोन पाझर तलाव फुटले आहेत. लोहारा तालुक्यातील मुरशदपूर येथील पाझर तलाव फुटल्याने पिकांचे नुकसान झाले. तर परंडा तालुक्यातील लोहारा वाघेगव्हाण पाझर तलाव फुटला. पुरात व पाण्यात अडकलेल्या 84 नागरिकांना प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविले. बेडगा येथील 2 , गुंजोटी 3 , राजेगाव 6 तर काळेवाडीतील 70 जणांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. उमरगा तालुक्यातील कदेर येथील अडकलेल्या दोन जणांना एअरलिफ्ट करून वाचवण्यात आले.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”