अखेर शेतकरी आंदोलन स्थगित; 378 दिवसांनी आंदोलन मागे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्याला विरोध म्हणून दिल्ली येथे शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून आंदोलन पुकारले होते. अखेर केंद्राने कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकऱ्यानीही आपले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल ३७८ दिवसांनी हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. ११ डिसेंबरपासून म्हणजे येत्या शनिवारपासून आंदोलनकर्ते परतणार आहेत.

केंद्र सरकारने पाठवलेला प्रस्ताव शेतकरी संघटनांनी मान्य केला आहे. सरकारकडून आलेल्या प्रस्तावाबाबत आम्हा सर्वांमध्ये एकमत झाल्याचे शेतकरी नेत्यांनी सांगितले. आम्ही मोठ्या विजयासह घरी परत जात असल्याचे किसान मोर्चाने सांगितले. ११ डिसेंबरपासून शेतकरी आपापल्या राज्यात घरी परतणार आहेत. सिंघू आणि टिकरी सीमेवर आंदोलन करणारे शेतकरी ११ डिसेंबरला पंजाबला रवाना होतील.

यूपी आणि हरयाणा सरकारने आंदोलनादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याच्या मुद्द्यावर तत्वतः संमती दिली आहे. केंद्राने पाठवलेल्या प्रस्तावावर गुरुवारी संयुक्त किसान मोर्चाने सिंघू सीमेवर बैठक घेतली. आंदोलन संपवण्यावर बैठकीत एकमत झाले. संयुक्त किसान मोर्चाची बैठक सुरू होण्यापूर्वीच शेतकऱ्यांनी आंदोलनस्थळी आपले तंबू हटवण्यास सुरवात केली होती.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरही घेण्यात आली. अनेक हॉलिवूड कलाकारांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. देशातही या आंदोलनामुळं अनेक घटना घडल्या. अखेर बळीराजासमोर सरकार झुकलं अन् पंतप्रधान मोदींनी कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा केली होती. पण जोपर्यंत कायदे घटनात्मक पद्धतीनं रद्द होत नाहीत, तोपर्यंत आमचं आंदोलन सुरुच राहणार असल्याचा स्पष्ट मत शेतकऱ्यांच्या वतीनं व्यक्त करण्यात आलं होतं.

Leave a Comment