असला सैतान मंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नाही; सदाभाऊ खोत यांची घणाघाती टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या बारा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे. कर्मचाऱ्यांनी आक्रमक पावित्रा घेतला आहे. शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला. “अनिल परब म्हणतात चर्चा कुणाशी करायची, अरे मग तुम्ही स्मशानात जा आणि भुतांशी चर्चा करा. तुम्हाला अनेकवेळा सांगितले कि चर्चा करा. मात्र, ते वारंवार सांगतायत चर्चा कुणाशी करायची. सरकारने गरिबांच्या चुलीत पाणी टाकले आहे. असला सैतानमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नाही, अशी घणाघाती टीका खोत यांनी केली.

शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या आंदोलनावरून परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणी साठी गेल्या 14 दिवसांपासून आंदोलन केले जात आहे. राज्य सरकारकडून हे आंदोलन दडपण्याचा पहिल्या दिवसापासून प्रयत्न केला जात आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. आपण कोणत्याही परिस्थितीत कायदा हातात घेणार नाही.

एन दिवाळीत राज्य सरकारने गरिबांच्या चुलीत पाणी टाकले आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार केले नसल्याने त्यांनी दिवाळीही साजरी केलेली नाही. कर्मचाऱ्यांची साधी मागणी आहे की राज्य सरकारच्या सर्व तरतुदी लागू कराव्यात एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे. मात्र, तीही मागणी मान्य केली जात नाही. अशा प्रकारचा सैतान असलेला परिवहनमंत्री महाराष्ट्राने आतापर्यंत पाहिलेला नाही, अशी टीका खोत यांनी केली आहे.