हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नाशिकच्या द्वारका पुलावर रविवारी रात्री भीषण अपघात ( Fatal Accident) झाला आहे. या अपघातात तब्बल सहा किशोरवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू तर सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे नाशिक-मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. परंतु तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
मिळालेल्या माहितीनुसार, लोखंडी सळ्यांनी भरलेला ट्रक धुळ्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना, त्याला मागून आलेल्या टेम्पोने जोरदार धडक दिली. यावेळी किशोरवयीन मुले टेम्पोच्या मागील भागात बसली होती. धडक इतकी जबरदस्त होती की, लोखंडी सळ्या मुलांच्या शरीरातून आरपार गेल्या. या अपघातात अधिक रक्तस्राव होऊन चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर रुग्णालयात नेल्यानंतर आणखी दोन मुलांनी प्राण गमावले.
दरम्यान, मृतांमध्ये अतुल मंडलिक, संतोष मंडलिक, दर्शन घरते, यश घरते आणि चेतन पवार यांचा समावेश आहे. यासह गंभीर जखमींमध्ये राहुल राठोड, लोकेश निकम, अरमान खान, ओम काळे, अक्षय गुंजाळ, आणि राहुल साबळे यांची नावे आहेत. ही मुले निफाड तालुक्यातील धारणगाव येथे एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेली होती. परंतु घरी परततानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला.