सातारा प्रतिनिधी शुभम बोडके
एबीपी माझाचे ज्येष्ठ पत्रकार राहुल तपासे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. रायगाव हद्दीत पुणे- बंगलोर महामार्गावर घडलेल्या घटनेचा सातारा जिल्ह्यातील पत्रकारांनी निषेध व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणातील संशयितांना अटक करण्याची मागणी केली. त्यानंतर एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.
रायगाव हद्दीत पुणे- बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर दि. 30 मे रोजी रात्री 12. 30 वाजण्याच्या सुमारास तक्रारदार राहूल हिंदुराव तपासे हे त्यांच्या (एमएच- 11- बीझेड- 1519) या ब्रीझा कारमधून साताराकडे येत होते. त्यावेळी (एमएच- 14- ईएच- 9) या फॉर्च्युनर कारमध्ये तिघेजण मद्यप्राशन करत कार चालवत होते. सदरची बाब राहूल तपासे यांनी पाहिली असता ‘आमच्याकडे का पाहिले’ या कारणातून चिडून जावून तक्रारदार राहूल तपासे यांना जीवे मारण्याच्या हेतूने त्यांच्या ब्रीझा कारला भीषण धडक दिली. सुदैवाने या घटनेत राहूल तपासे बचावले आहेत. या घटनेनंतर संशयित कार चालक मात्र तेथून कारसह फरार झाले.
साताऱ्यातील पत्रकारांनी जिल्हा पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना सांगून तात्काळ घटनेचा शोध घेवून संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी केली. यानंतर तात्काळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी भुईंज पोलिसांना तात्काळ तपासाच्या सूचना करताच याप्रकरणातील एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकारानंतर हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी. सदर घटनेत हल्लेखोरांवर पत्रकार हल्ला विरोधी कायदानुसार कारवाई करावी, अशी मागणी देखील सातारा जिल्ह्यातील पत्रकारांच्या वतीने करण्यात आली आहे.