हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पुणे शहरात (Pune City) कोयत्याच्या हल्ल्यांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता नुकत्याच घडलेल्या घटनेत सिंहगडाच्या (Sinhgad) पायथ्याशी असलेल्या आतकरवाडी भागात एका तरुणावर भररस्त्यात कोयत्याने सपासप वार करण्यात आले आहेत. महत्वाचे म्हणजे, हा हल्ला होत असताना हवेली पोलीस स्टेशनचे कर्मचारी मटण पार्टीमध्ये व्यस्त होते. त्यामुळे पुन्हा एकदा शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पोलिसांच्या मटण पार्टीच्या जवळच हल्ला
सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडीत एका हॉटेलमध्ये हवेली पोलीस ठाण्यातील काही अधिकारी आणि कर्मचारी मटण पार्टीसाठी जमले होते. याचवेळी, अवघ्या काही अंतरावर एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी बेधडकपणे तरुणाच्या हातावर, पायावर आणि डोक्यावर वार केले. या हल्ल्यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. सध्या या तरुणावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या सर्व घटनेनंतर सिंहगड जवळ राहणाऱ्या नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक नागरिकांकडून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत. जर या हल्ल्यावेळी पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले असते तर हा हल्ला होऊच शकला नसता असे अनेक नागरिकांनी म्हटले आहे. आता या सर्व प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत आपला तपास सुरू केला आहे.
महत्वाचे म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. गावगुंड, टोळक्यांमधील वाद आणि कोयत्याचे हल्ले यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता अशा प्रकरणांना आळा घालण्यासाठी पोलीस काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.