रोज छेडछाड करणाऱ्या रोडरोमियोला विद्यार्थिनीनी भर रस्त्यात दिला धू-धू धुतलं

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात काही विद्यार्थिनींनी एका रोड रोमिओला चांगलीच अद्दल घडवली आहे. रोजच्या छेडछाडीला कंटाळून पीडित विद्यार्थिनींनी आरोपीला भर रस्त्यात धू धू धुतलं आहे. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. या विद्यार्थिनीनी या रोडरोमिओला भर रस्त्यात चप्पलेने मारहाण केली आहे.

काय आहे प्रकरण?
संबंधित घटना जळगाव जिल्ह्याच्या बोदवड तालुक्यातील येवती येथील आहे. रोड रोमिओच्या रोजच्या त्रासाला कंटाळून येथील काही विद्यार्थिनी एकत्र येऊन त्या आरोपीला बेदम चोप दिला आहे. तसेच यावेळी आजूबाजूला जमलेल्या लोकांनीदेखील या आरोपी रोडरोमिओला बेदम मार दिला आहे.

नेमकं काय घडलं?
मागील काही दिवसांपासून राज्यात एसटी बसेस बंद आहेत. अशात कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू करण्यात आले आहे. पण एसटी बंद असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पायपीट करत शाळा-महाविद्यालयात जावं लागत आहे. यादरम्यान एक तरुण मागील काही दिवसांपासून या विद्यार्थिनींचा पाठलाग करत होता. समज देऊनही आरोपी त्यांचा पाठलाग करायचं थांबवत नव्हता. यानंतर या विद्यार्थिनींनी एकत्र येऊन आरोपीला धडा शिकवण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी त्या आरोपीला भर रस्त्यात चप्पलेने मारहाण करून चांगलाच धडा शिकवला आहे.