हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अहमदनगर ही तशी सहकाराची पंढरी… त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी जिल्ह्यातल्या घराघरात जाऊन पोहोचली.. अपवाद फक्त अहमदनगर शहराचा… सर्वांना आश्चर्य वाटेल पण नगर शहर हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय.. तब्बल 25 वर्ष अनिल राठोड यांनी अहमदनगर शहर मध्ये कायम भगवा फडकवत ठेवला… पण 2014 ला राष्ट्रवादीच्या संग्राम जगताप यांनी फाटाफुटीच्या राजकारणाचा फायदा घेत अहमदनगर शहर मतदारसंघावर वर्चस्व मिळवलं… ते आमदार झाले… हीच गोष्ट 2019 लाही रिपीट झाली… त्यामुळे मागील एक दशक या मतदारसंघावर होल अँड सोल फक्त आणि फक्त संग्राम जगताप पॅटर्नच चालतोय… जगतापांचे पारंपारिक विरोधक अनिल राठोड यांचे निधन झाल्यामुळे त्यांना विधानसभेला म्हणावा असा कडवा प्रतिस्पर्धी उरला नाही… पण राष्ट्रवादीच्या फुटीत संग्राम जगतापांनी धाकल्या पवारांची वाट धरल्यामुळे आता जगतापांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी शरद पवार – जयंत पाटील मैदानात उतरलेत… त्यांनी तुतारीकडून एका नव्या नावाला मतदार संघासाठी बळ द्यायला सुरुवात केलीय…
यासोबतच जवळपास विसच्या घरात काही नवखे तर काही अनुभवी राजकीय मंडळीही उमेदवारीच्या प्रतीक्षेत आहेत… त्यामुळे अहमदनगर शहरमधून संग्राम जगतापांना आमदारकीची हॅट्रिक करण्यासाठी नेमकं कोणत्या आव्हानांना सामोर जावं लागणार आहे? किरण काळे – अभिषेक कळमकर – भगवान फुलसुंदर – राणी लंके यापैकी नेमकी कुणाच्यात जगतापांच्या बालेकिल्लाला सुरुंग लावण्याची धमक आहे? अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक कशी होईल? मतदारसंघाचे प्रश्न काय आहेत? आघाडी युती नगरमध्ये कशी वर्क करते? आमदार साहेब जगतापांचं दहा वर्षांचं रिपोर्ट कार्ड काय सांगतय? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या विधानसभेला अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचा आमदार कोण होतोय? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…
तसं बघायला गेलं तर अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघावर शिवसेना एके शिवसेना… अन् शिवसेना दुणे शिवसेना… असंच वातावरण होतं… अनिल राठोड इथले पर्मनंट आमदार म्हणून ओळखले जात होते… पण त्यांच्या वर्चस्वाला धक्का बसला… राष्ट्रवादीच्या संग्राम जगतापांनी राठोडांचा टांगा पलटी घोडे फरार करत राष्ट्रवादीला शहरामध्ये बस्तान बांधून दिलं… ते आमदार झाले… 2019 लाही संग्राम जगतापांनी राठोड यांना जड जात आमदारकी आपल्याजवळच ठेवली… विशेष म्हणजे 2019 च्या लोकसभेला संग्राम जगताप भाजपच्या सुजय विखे यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या तिकिटावर उभे होते… लोकसभेला पराभव झाल्यानंतर लागलीच विधानसभा निवडणूक जिंकत त्यांनी आपलं राजकारण पुन्हा एकदा स्टेबल केलं… मधल्या काळात त्यांच्या शिवसेनेत जाण्याच्या बऱ्याच वावड्याही उठल्या.. पण ते राष्ट्रवादीशी एकनिष्ठ राहिले… खरंतर अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीसाठी सगळं काही ऑल ओके चाललं होतं… पण राष्ट्रवादीत फूट पडली आणि स्थानिक समीकरणा ध्यानात घेऊन संग्राम जगतापांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला… मधल्या काळात अनिल राठोड यांचं निधन झाल्यानं जगतापांच्या विरोधात तोडीच तोड द्यावा असा उमेदवारच महाविकास आघाडी किंवा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे नाहीये, असं बोललं जाऊ लागलं… पण वेळ जशी पुढे सरकत गेली तशी अनेक नावं समोर येऊ लागली… लोकसभा निवडणुकीचा निकाल आघाडीच्या बाजूने लागला असला तरी अहमदनगर शहर विधानसभेतून लीड हे सुजय विखेंना मिळालय… पण यात संग्राम जगताप यांच्या इतकाच स्थानिक भाजप नेत्यांचाही मोठा वाट असल्याने कमळानेही नगरवर क्लेम करायला सुरुवात केलीये… दुसऱ्या बाजूला शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट अहमदनगरच्या जागेसाठी आग्रही आहेत…
यात भाजपकडून अभय आगरकर, महेंद्र गंधे यांनी उमेदवारासाठी दंड थोपटलेत.. माजी खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे यांच्या उमेदवारीची मागणीही स्थानिक कार्यकर्त्यांकडून जोरदार उचलून धरली जात आहे… त्यात भाजप महिला मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्ष्या प्रिया जानवे यांनी पक्षाने संधी दिल्यास विधानसभेसाठी तयार असल्याचं बोलून दाखवल्याने महायुतीमध्ये तिकीट वाटपावरून संघर्षाची ठिणगी पडू शकते… लोकसभेला सुजय विखेंना मिळालेल्या मताधिक्यामध्ये जितका आमदार साहेब जगतापांचा वाटा आहे अगदी तितकाच भाजपचा देखील… त्यामुळे अनेक दशकांपासून अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघात कमळ फुलवण्याची इच्छा भाजप यंदा पूर्ण करेल का? ते पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे…
दुसऱ्या बाजूला उमेदवारीची खरी चुरस आहे ती महाविकास आघाडीमध्ये… संग्राम जगताप अजितदादा गटात गेल्याने शरद पवार गटातील… तर त्यांचे पारंपारिक विरोधक दिवंगत आमदार अनिल राठोड हे शिवसेनेत असल्याने ठाकरे गट… उमेदवारीसाठी एकमेकांवर तुटून पडलेत… यात शरद पवार गटाकडून अभिषेक कळमकर यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे… शिवसेनेतून शरद पवारांची तुतारी हाती घेणारे अभिषेक कळमकर तसे मूळ राष्ट्रवादीचेच… त्यांचे काका माजी आमदार दादा कळमकर हे शरद पवारांचे अत्यंत कडवे एकनिष्ठ म्हणून समजले जातात… 2019 ला अभिषेक राष्ट्रवादीच्या तिकिटावर विधानसभेसाठी इच्छुक होते… मात्र जगताप आणि कळमकर यांच्यात राजकीय खटके उडाल्याने तेव्हा त्यांनी तडकाफडकी शिवसेनेचं धनुष्यबाण हाती बांधलं… मात्र राष्ट्रवादीच्या फुटीत जगताप अजितदादा गटात गेल्याने शरद पवार गटातील स्पेस भरून काढण्यासाठी कळमकर यांनी जयंत पाटलांच्या हातून राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षात प्रवेश केला… त्यामुळे घड्याळ विरुद्ध तुतारी… राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी… जगताप विरुद्ध कळमकर अशी तगडी लढत 2024 ला मतदारसंघात पाहायला मिळू शकते… पण यात एक अडथळा आहे तो शिवसेना ठाकरे गटाच्या इच्छुकांच्या गर्दीचा…
शिवसेना ठाकरे गटाचे माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहर प्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, बाळासाहेब बोराटे यांची नावं यात सर्वाधिक चर्चेत आहेत.. यातील फुलसुंदर आणि बोराटे हे माळी समाजातून येत असल्याने या समाजाचे एकगठ्ठा मतदान लक्षात घेऊन या दोघांच्या नावाचाही महाविकास आघाडी गांभीर्याने विचार करू शकते… मात्र अहमदनगर हा सर्व जातींचा संमिश्र मतदारसंघ म्हणून ओळखला जातो… त्यामुळे तिथे जातीय समीकरण हा फॅक्टर महत्त्वाचा असला, तरी तो निर्णायक मात्र कधीच नसतो… पण लोकसभेला मुस्लिम आणि दलित समाजाकडून मतदानाची वाढलेली टक्केवारी ही जगतापांना नगरमध्ये मायनस मध्ये घेऊन जाऊ शकते… बाकी लोकसभेला जगतापांनी सुजय विखेंचं काम केल्याने… आणि जगताप – विखे यांच्यातील मैत्री सर्वश्रुत असल्याने विखे पाटलांची मोठी ताकद विधानसभेला संग्राम जगतापांच्या पाठीशी राहणार आहे…
उरला प्रश्न तो विकास कामांचा… तर एमआयडीसी परिसरात वाढलेली गुंडगिरी – अवैध धंदे यामुळे मोठे प्रोजेक्ट किंवा लहान सहान स्टार्टपही यायला इथे खीळ बसलीय… अनेक ठिकाणी चालता येतील असे अजून धड रस्ते देखील नाहीयेत…. बेरोजगारी आणि घनकचरा व्यवस्थापनाचा आजही मोठा प्रश्न शहरापुढे आहे… बाकी संग्राम जगताप यांनी मागील काही वर्षात भरीव निधी मतदार संघासाठी आणलाय… यामध्ये रस्त्यांची काम, उड्डाणपूल, सौर ऊर्जा प्रकल्प आणि उद्यानांची काम जवळपास पूर्णत्वास आली आहेत… त्यामुळे जगतापांच्या तब्बल एक दशकाच्या राजकीय वर्चस्वाच्या काळानंतर त्यांना आव्हान द्यायला नेमका कोणता भिडू मैदानात उतरेल? मशाल की तुतारी चिन्हावरून लढत दिल्यास जगतापांसाठी सामना अटीतटीचा होऊ शकतो? अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार कोण? या सगळ्याबद्दल तुमचा कौल कुणाच्या बाजूने? तो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा…