हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रोएशिया विरुद्ध दमदार विजय मिळवून फिफा विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत गेलेल्या अर्जेंटिनाच्या चाहत्यांचा आनंद फार काळ टिकला नाही, कारण या विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामना आपल्या वर्ल्ड कप कारकिर्दीतील अखेरचा सामना असू शकतो असं मोठं विधान अर्जेंटिनाच्या फुटबॉल संघाचा कर्णधार आणि स्टार फ़ुटबाँलपटू लियोनल मेस्सी याने केलं आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
अर्जेंटिनाचा मीडिया हाऊस आउटलेट डियारियो डेपोर्टिवो ओलेशी बोलताना मेस्सी म्हणाला, मला खूप बरे वाटते की आमचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. विश्वचषक फायनल मध्ये अखेरचा सामना खेळून मी माझा विश्वचषक प्रवास संपवेन. पुढच्या विश्वचषकासाठी बरीच वर्षे आहेत आणि मला वाटत नाही तोपर्यंत मी खेळेल. त्यामुळे इथेच माझा प्रवास थांबवण सर्वोत्तम आहे.
३५ वर्षीय मेस्सी जगभरातील प्रसिद्ध फ़ुटबाँलपटू म्हणून ओळखला जातो. मेसी यंदा आपला पाचवा विश्वचषक खेळत आहे. त्याने चार विश्वचषक खेळलेल्या अर्जेंटिनाच्या दिएगो मॅराडोना आणि जेवियर मास्चेरानोला मागे टाकले आहे. परंतु मेस्सी एकदाही अर्जेंटिनाला विश्वचषक जिंकू देऊ शकलेला नाही. मात्र मेसी सुद्धा फॉर्मात आहे आणि अर्जेंटिनाचा संघही फायनल मध्ये पोचला आहे. त्यामुळे यावर्षी अर्जेंटिनाच विश्वचषक जिंकावा अशी अपेक्षा फ़ुटबाँलप्रेमी व्यक्त करत आहेत.