औरंगाबाद : गेल्या दोन आठवड्यापासून पावसाने दडी मारली होती. मात्र गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे शहरवासीसह शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. मागच्या पंधरा दिवसापासून पाऊस नसल्याने पिकाने माना टाकून दिल्या होत्या. शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट सतावत होते. आता पाऊस पडल्याने दुबार पेरणीचे संकट टळले आहे. आणि पिकांनाही जीवनदान मिळाले आहे.
मागच्या महिन्यात 28 जूनला शहरात पावसाने हजेरी लावली होती त्यानंतर सलग दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात सर्वदूर पाऊस पडल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना थोडाका होईना दिलासा मिळाला आहे. पावसाअभावी काही शेतकऱ्यांचे पिक करपून गेले होते तर काही शेतकऱ्यांच्या पेरण्या राहिल्या होत्या. आता पाऊस पडल्याने पिकांना जीवनदान मिळाले. शेतकऱ्यांनी पुन्हा पेरणी करायला सुरुवात केली आहे त्यात कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी हे पिके लावण्यास सुरुवात केली आहे.
गेल्या आठवड्यामध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण दिसून येत होते मात्र पाऊस काही पडत नव्हता. जुलैमध्ये सर्वत्र पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले पण जुलैचा पहिला आठवडा कोरडा गेला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांचे डोळे हे पावसाकडे लागले होते. गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली. जिल्ह्यात आजपासून दहा दिवस सर्वदूर पाऊस पडणार आहे अशी शक्यता हवामान खात्याने दर्शवली आहे.