मुलीच्या आईने धमकावल्याने पंधरा वर्षीय मुलाची आत्महत्या

औरंगाबाद – एका पंधरा वर्षीय मुलाने हॉटेलमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री फर्दापूर येथे घडली. याप्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध फर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सय्यद परवेज सय्यद राजिक (रा. ठाणा, ता. सोयगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.

रविवारी रात्री फर्दापूर येथील एका हॉटेलमध्ये सय्यद परवेज याने गळफास घेतल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाला रुग्णालयात हलविण्यात आले. शाळेत तू माझ्या मुलीच्या बेंचवर का बसला, असे म्हणून सदर महिलेने गुरुवारी सय्यद परवेजला शिवीगाळ केली व तुझे नाव शाळेतून काढायला लावेल, अशी धमकी दिल्यानेच त्याने आत्महत्या केल्याचा आरोप मयताच्या नातेवाइकांनी केला.

आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपीस अटक करेपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मृताच्या नातेवाइकांनी घेतल्याने सोमवारी परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यानंतर मयत परवेजचे वडील सय्यद राजिक सय्यद आरीफ यांच्या फिर्यादीवरून फर्दापूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि. अमोल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.