केंद्रीय मंत्री दानवे, कराड यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करा – हर्षवर्धन जाधव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कन्नड – नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारे कन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत यावेळी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि कराड यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे कोरोनामुळे रात्री 10 वाजेनंतर निर्बंध असताना दोन केंद्रीय मंत्री यांचा कार्यक्रम रात्री बारा वाजेपर्यंत चालला पोलिसांनी आयोजकांवर गुन्हे दाखल केले. मात्र मंत्र्यांना का सोडले ? मंत्री राज्यघटनेपेक्षा मोठे आहेत का ? असा सवाल करत माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दोन्ही केंद्रीय मंत्र्यांनी विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी कन्नड येथे पत्रकार परिषदेत केली.

पुढे बोलताना माजी आमदार जाधव म्हणाले की, औरंगाबाद व जालना या जिल्ह्यांना केंद्रीय मंत्री पद मिळाले ही बाब स्वागतार्ह असून जनतेला आपल्या पदरात काही तरी पडेल एखाद्या मोठ्या विकास योजनेची घोषणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र ती या मंत्र्यांनी फोल ठरवली. कन्नड तालुक्यातील हतनूर येथे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी पायातील बूट आसह मंदिरात प्रवेश करून राजकीय कार्यक्रम घेतला. यावेळी ग्रामस्थांनी औरंगाबाद चाळीसगाव रेल्वे लाईन करण्याची मागणी केली तेव्हा तुम्हाला चाळीसगावला काय बोर विकायला जायचे आहे का ? असे म्हणत केंद्रीय मंत्र्यांनी त्यांची खिल्ली उडवली. असेही जाधव यांनी सांगितले.

गेल्या चाळीस वर्षापासून जाधव कुटुंब कन्नड तालुक्याच्या राजकारणात सक्रिय असून विकास महर्षी स्वर्गीय रायभानजी जाधव यांच्या मुळे महाराष्ट्रात तालुक्याची ओळख असून कोणी दत्तक घ्यावे इतके दरिद्र अजून झालेले नाही असा टोलाही हर्षवर्धन जाधव यांनी त्यांचे सासरे रावसाहेब दानवे यांना नाव न घेता लगावला.