मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या फायलीवरील शेराच बदलला ; मंत्रालयातील घटनेने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका फायलीसोबत छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी शेरा दिल्यानंतर तो बदलण्यात आल्याचा प्रकार समोर आला त्यामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून या सगळ्याचा छडा लावण्यासाठी मरीनड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स ऑफ इंडिया’च्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याची चौकशी करण्याचे आदेश काढले होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधित फाईलवर सहीदेखील केली होती. मात्र, त्यानंतर या फाईलमधील मजकूर परस्पर बदलण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या वरच्या भागात लाल पेनाने एक अतिरिक्त मजकूर लिहण्यात आला होता. त्यामध्ये संबंधित अभियंत्याची चौकशी बंद करावी, असे म्हटले होते. साहजिकच हा प्रकार उघड झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली.

फायलीवर ज्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी सही केली होती, त्याच्या वरील भागात लाल रंगाच्या पेनाने छोट्या अक्षरांमध्ये शेरा लिहिलेला होता. त्यामुळे अशोक चव्हाण यांना संशय बळावला. त्यांनी पुन्हा चौकशीसाठी ही फाईल पाठवली असता त्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला. या प्रकरणी आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

प्रशासनाकडून गंभीर दखल

मुख्यमंत्र्यांनी एखाद्या फाईलवर सही करण्याला खूपच महत्त्व आहे. हा सरकारचा अंतिम निर्णय मानला जातो. त्यानंतर संबंधित निर्णयात सहसा कोणता बदल होत नाही. मुख्यमंत्र्यांच्या एका सहीमुळे कोट्यवधी रुपयांचा निधी हस्तांतरित केला जातो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या फाईलमधील मजकुराशी अशाप्रकारे छेडछाड होणे, खूपच गंभीर बाब मानली जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment