औरंगाबाद | सोमवारी रात्री व्हीआयपी हॉल समोरील रस्त्यात बापलेकाने वाहन आडवे लावल्यामुळे भांडण झाले होते. या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याप्रकरणी पोलीस आयुक्त आणि डॉ. निखिल गुप्ता यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. त्याचबरोबर त्याठिकाणी असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना देखील डॉ. निखील गुप्ता यांनी धारेवर धरले.
मोहंमद वाहेद आणि मोहंमद फरहान मोहंमद वाहेद असे या बाप लेकाचे नाव असून या दोघांविरुद्ध जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याचबरोबर त्याठिकाणी असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. सहाय्यक फौजदार आयुब पठाण आणि पोलीस अंमलदार संजय गावंडे असे या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
हाती आलेल्या माहितीनुसार, सोमवारी आयुब पठाण आणि संजय गावंडे हे दोघे ठाण्यातील थ्री मोबाइल शासकीय वाहन घेऊन आरोपीला सोडण्यासाठी करमाड येथे गेले होते. आरोपीला सोडून ते सेंटर नाका मार्गे व्हीआयपी फंक्शन हॉल समोरून जिन्सी हद्दीत जात होते. त्यांचे वाहन फातेमा मॅटर्निटी हॉस्पिटल समोरून जात असताना रस्त्यात रिक्षा आडवी उभी होती. यावेळी हॉर्न देऊन आणि सायलेन्सर वाजवून देखील रिक्षाचालक गाडी काढायला आला नाही. गावंडे आणि पठाण जाब विचारण्यासाठी खाली उतरले असता मोहंमद वाहेद आणि मोहंमद फरहान मोहंमद वाहेद यांनी पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. या प्रकरणानंतर जिन्सीतील पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी चौकशी करून आयुक्तांना याबाबत माहिती दिली. यावरून आयुक्तांनी परिस्थिती हाताळण्यास अपयशी ठरलेल्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात संलग्न करण्याचे आदेश दिले आणि त्या बाप लेका विरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.