मोबाईल चोरीच्या संशयावरून परप्रांतीयांच्या दोन गटात फिल्मीस्टाईल राडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे

मोबाईल चोरीच्या संशयाने वाघवाडी फाटा परिसरातील परराज्यातून आलेल्या आयुर्वेदिक औषध विक्रेत्यांनी पाठलाग करत उत्तरप्रदेशच्या एका तरूणाला पकडले. कोल्हापूर रस्त्यावर सकाळी 8 च्या दरम्यान दोन्ही परप्रांतियांच्यात मोबाईल चोरीवरून चांगलाच राडा झाला. छोटी मुले, महिला साहित्य डोक्यावर घेवून शास्त्रीनगरमधील एका गल्लीत अचानक आरडाओरडा करत सुटल्याने एकच गोंधळ उडाला. आयुर्वेदीक औषध विक्रेत्याच्या कुटुंबियांनी पाठलाग करून पकडलेल्या तरूणाला पोलिसांच्या स्वाधीन केले.

पहाटे 3 च्या दरम्यान वाघवाडी फाटयावर असणाऱ्या परप्रांतीयांच्या औषध विक्री तंबूतून दोन मोबाईल चोरीला गेले. तंबूत झोपलेल्या तरूणांना मोबाईल चोरीची जाणीव झाली. काही वेळातच दोघा तरूणांनी चोरटयांचा पाठलाग केला. सकाळी औषध विक्रेत्यांनी चोरटयांचा शोध सुरूच ठेवला. तेव्हा वाघवाडी ते इस्लामपूर रस्त्याकडेच्या माळरानावर काही लोक दिसले. तिथे जावून पाहणी केली असता दोन तरूण काही मोबाईलमधील सिमकार्ड काढत होते. हेच मोबाईल चोर असावेत म्हणून औषध विक्री करणाऱ्या तरूणाने आपल्या इतर सहकाऱ्यांना याची माहिती दिली.

तिघे-चौघेजण एकत्रित येत या तरूणांकडे विचारणा करण्यासाठी पुढे आल्यावर त्यांनी मोठया संख्येने असणारे मोबाईल घेवून पोबारा केला. तेव्हा त्या तरूणांसोबत असणारे इतर कुटुंबियही साहित्याची गाठोडी डोक्यावर घेवून सैरावैरा धावू लागले. त्यांनी इस्लामपूर शहराकडे धाव घेतली. मुख्य रस्त्यावरून हा 15 ते 20 जणांचा घोळका शास्त्रीनगर मधील छोटया कॉलनीत घुसला. तेव्हा वाघवाडी फाटयावरील औषध विक्रेत्याच्या कुटुंबियांनीही तेथे धाव घेत महिलांची गाठोडी रस्त्यावरच सोडून चोरीचा मोबाईल आहे का याची चाचपणी केली. तेव्हा महिलांनी साहित्याची ओढाओढ करत जोरदार गोंधळ केला. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून धाव घेत औषध विक्रेत्यांनी मोबाईल चोरीच्या संशयावरून पकडलेल्या तरूणाला पोलिस गाडीत बसवले.

Leave a Comment