औरंगाबाद प्रतिनिधी। लहान मुले ही प्रचंड चंचल असतात. त्यामुळे त्यांच्या खेळण्या-बागडण्यावर पालकांना कायम योग्य ती काळजी घ्यावी लागते. मात्र अनावधानाने नजर चुकल्यामुळे किती दुर्दैवी घटना घडू शकते याची प्रचिती औरंगाबाद शहरातील सेंट्रल नाका येथील मनपा कोर्टर भागात समोर आली आहे. घरातील अंगणात खेळणारी ३ वर्षीय मुलगी गरम पाण्याच्या पातेल्यात पडल्याची दुर्दैवी घटना २७ नोव्हेंबर रोजी घडली होती. तेंव्हा पासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र काल त्या चिमुकलीने अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान दि.२७ नोव्हेंबर रोजी आराध्या आकाश शिंदे हि ३ वर्षांची मुलगी घरातील अंगणामध्ये खेळत होती. त्यांच्या घरासमोर सकाळी अंघोळीसाठी गरम पाणी चुलीवर ठेवलेले होते. पाणी उकळत असल्याने आराध्याच्या आईने ते पाण्याचे पातेले चुलीवरून उतरवत खाली ठेवले. आणि घरातील इतर कामे ती करु लागली.
आई घरात गेल्यावर अंगणात खेळणारी आराध्या खेळता खेळता पातेल्यातील गरम पाण्यामध्ये पडली. तिच्या किंकाळ्या कानावर येताच आईने धाव घेत तिला त्या उकळत्या पाण्यातून बाहेर काढले. घरच्यांना त्यांनी तातडीने माहिती दिली असता आराध्याला रुग्णालयात हलविले. तेंव्हा पासून तिच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारा दरम्यान तिचा मंगळवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास तिची प्राणज्योत मावळली आहे. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र आराध्याच्या दुर्दैवी जाण्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
ReplyForward
|