कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी
पुणे- बंगलोर महामार्गावरील कोल्हापूर नाका येथील कराड शहराजवळील उड्डाणपूल पाडण्याचा अखेर मुहूर्त ठरला. त्यासाठी कराड शहरात उड्डाणपूलाच्या खालून येणारी वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर कराड येथील शासकीय विश्रामगृहात संबधित विभाग यांची माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आढावा बैठक घेतली. यानंतर कोल्हापूर नाका व ढेबेवाडी फाटा येथे दोन्ही पूलाची पाहणी करून संबधित कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. कराडचा उड्डाणपूल हा आज मध्यरात्रीपासून बंद होणार असून उद्या दिवसाच पूल पाडण्याच्या कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती हॅलो महाराष्ट्रला डीपी जैन कंपनीचे सतेंद्रा कुमार वर्मा यांनी सांगितले आहे.
कराड येथील शासकीय विश्रामगृहात माजी मुख्यमंत्री व कराड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण, रयत कारखान्याचे चेअरमन अॅड. उदयसिंह पाटील- उंडाळकर, पोलिस उपअधीक्षक डाॅ. रणजीत पाटील, प्रातांधिकारी उत्तम दिघे, कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील, वाहतूक शाखेच्या सरोजीनी पाटील, काॅंग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज मोरे, झाकीर पठाण, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, निवास थोरात, नितीन काशिद, दादासो शिंगण यांच्यासह कराड व मलकापूर शहरातील पदाधिकारी तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
कराड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या कोल्हापूर नाका येथील 2003 साली बांधलेला उड्डाणपूल जमीनदोस्त होणार आहे. त्याठिकाणी 550 कोटी रूपये खर्चून 3.2 किलोमीटर अतंराचा सहापदरीकरणचा उड्डाणपूल होणार आहे. या पूलाचे काम अदानी समूहाला दिले असून डीपी जैन ही कंपनी काम करणार आहे. शनिवारी मध्यरात्री म्हणजेच रविवारी दि. 5 रोजी 12 नंतर सदरील उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करण्याबाबत जिल्हा पोलिस प्रमुख समीर शेख यांनी अधिसूचना जारी केली होती. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून वाहतूक सुरू असल्याने नक्की पूल कधी पाडणार याबाबत चर्चांना उधाण आले होते. परंतु, आता या प्रोजक्टचे प्रमुख इंजिनिअर सतेंद्रा कुमार वर्मा यांनी ही अधिकृत माहिती दिलेली आहे.