मुंबई । नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. बांधकाम कामगारांना आता आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचे महाविकास आघाडीच्या सरकारने जाहीर केले आहे. याबाबत दुसराही हप्ता मंजूर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील १० लाख बांधकांम कामगारांना लाभ मिळणार आहे. DGIPR महाराष्ट्राने ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदित सक्रिय (जीवित) बांधकाम कामगारांना आणखी ३ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. बांधकाम कामगारांच्या खात्यात दुसरा हप्ता मंजूर करण्याबाबत कामगार मंत्री यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला आहे. अर्थसहाय्य वाटपावर मंडळामार्फत ३०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
कोरोना विषाणूच्या प्रादूर्भाव कालावधीत २ हजार रुपयाच्या अर्थसहाय्याचा पहिला हप्ता एप्रिल २०२० मध्ये मंजूर करण्यात आला होता. या निर्णयानुसार जुलै २०२० पर्यंत राज्यातील ९ लाख १४ हजार ७४८ बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात अर्थसहाय्याची रक्कम जमा करण्यात आली. यासाठी मंडळाने १८३ कोटी रुपये खर्च केले.
#COVID_19 च्या पार्श्वभूमीवर बांधकाम कामगारांना २ हजार रुपयांच्या अर्थसहाय्याचा पहिला हप्ता एप्रिलमध्ये मंजूर. त्यानुसार जुलैपर्यंत राज्यातील ९ लाख १४ हजार ७४८ बांधकाम कामगारांच्या बँक खात्यात १८३ कोटींची रक्कम वर्ग- कामगार मंत्री @Dwalsepatil यांची माहिती
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 13, 2020
सध्या राज्यात लॉकडाऊन कालावधीला टप्प्याटप्प्याने शिथिलता देण्यात येत आहे. तथापि, इमारत आणि इतर बांधकामे अद्यापही पूर्ववत सुरू झालेली नाही त्यामुळे बांधकाम कामगांराना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बाब विचारात घेऊन नोंदित बांधकाम कामगारांना तीन हजार रुपयाचा अर्थसहाय्याचा दुसरा हप्ता मंजूर करण्याचा निर्णय कामगार विभागाने घेतला. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी सुरू होणार असून याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”