नवी दिल्ली । युक्रेनसोबतच्या युद्धामुळे निर्बंधांचा सामना करत असलेल्या रशियाने भारताला आयात मालाचे पैसे देण्याची ऑफर दिली आहे. भारत सरकार आता या प्रस्तावावर विचार करत आहे. डॉलरमध्ये पेमेंट बंद झाल्यामुळे, रशियाच्या सेंट्रल बँकेने पेमेंटची एक सिस्टीम विकसित केली आहे. भारत प्रामुख्याने रशियाकडून कच्चे तेल आणि शस्त्रे आयात करतो. याशिवाय युक्रेनकडून पुरवठा खंडित झाल्यामुळे या महिन्यात भारताने रशियाकडून सूर्यफूल तेलाचा मोठा सौदा केला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रशियाची मेसेजिंग सिस्टीम SPFS वापरून भारत रुपया-रुबलमध्ये पेमेंट करू शकतो. मात्र, अद्यापपर्यंत भारत सरकारने या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव गुरुवारी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. यावेळी या प्रस्तावावर विचार होणे अपेक्षित आहे. त्या बदल्यात भारताला रशियाकडून कमी किंमतीत कच्चे तेल मिळण्याची आशा नाकारता येत नाही. असे झाल्यास भारतासाठी मोठा दिलासा असेल.
रशियाची ‘ही’ सिस्टीम अशा प्रकारे काम करेल
सूत्रांनी सांगितले की, या प्रस्तावांतर्गत रशियन चलन रुबल भारतीय बँकांमध्ये जमा केले जाईल आणि त्याचे रूपांतर भारतीय चलन रुपयामध्ये केले जाईल. त्याचप्रमाणे, रूपयाचे रूबलमध्ये रूपांतर करून पेमेंट केले जाईल. याशिवाय रशियाला भारतीय आणि रशियन बँकांनी जारी केलेले कार्ड एमआयआर पेमेंट सिस्टीमशी जोडायचे आहेत.
रशियन अधिकारी भारतात येणार आहेत
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रस्तावावर रशियाच्या मध्यवर्ती बँकेच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली जाईल. यासाठी रशियाच्या मध्यवर्ती बँकेचे अधिकारी पुढील आठवड्यात भारतात येऊ शकतात. रशियन शस्त्रास्त्रांवर भारतीय लष्कराचे अवलंबित्व आणि वाढत्या आंतरराष्ट्रीय किंमती यामुळे भारत रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्यास उत्सुक आहे.
रशियावर आंतरराष्ट्रीय निर्बंध असूनही स्वस्त तेलाच्या आशेने भारताला द्विपक्षीय व्यापार सुरू ठेवायचा आहे. त्याचबरोबर चीनच्या लष्करी आक्रमकतेमुळे भारताने रशियाकडून शस्त्रास्त्रे खरेदी सुरू ठेवणे आवश्यक असल्याचे अमेरिकेसह इतर पाश्चात्य देशांना सांगितले आहे. भारताने रशियाची ही ऑफर स्वीकारल्यास भारताचे परकीय चलन तर वाचेलच पण त्याबरोबर भारतीय चलन देखील आणखी मजबूत होईल.