हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुसलमीन पक्षाचे नेते आणि मुंबईतील भायखळा मतदारसंघाचे माजी आमदार वारिस पठाण यांच्याविरुद्ध कर्नाटकच्या कलबुर्गी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारिस पठाण यांनी १५ फेब्रुवारी रोजी कर्नाटकच्या गुलबर्गामध्ये एका जाहीर सभेत बोलताना ‘१०० कोटी हिंदूंवर १५ कोटी मुस्लीम भारी पडतील’ असं वादग्रस्त विधान केलं होतं.
वारिस पठाण यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर समाजातील विविध स्तरांतून टीका करण्यात आली. एआयएमआयएम अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देखील वारीस पठाण यांच्यावर कारवाई केलेली आहे. वारीस पठाण यांना माध्यमांवर बोलण्यास पक्षाकडून बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे, पक्षाचे पुढचे आदेश येईपर्यंत वारिस पठाण सार्वजनिक रुपात कोणतंही वक्तव्य करू शकणार नाहीत. तर, दुसरीकडे औरंगाबादचे खासदार व एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी देखील वारीस पठाण यांच्या हिंदू-मुस्लिम वक्तव्यावर स्पष्टीकरण मागणार असल्याचं सांगितलेलं आहे.
दरम्यान, वारीस पठाण यांच्या गुलबर्ग्यातील वादग्रस्त विधानासाठी पठाण यांच्याविरोधात पुण्यामध्येही तक्रार दाखल झाली आहे. याचसोबत आता कलबुर्गी पोलिसांनीही भारतीय दंड विधानाच्या कलम ११७, १५३ (दंगा भडकावण्याचा प्रयत्न) आणि कलम १५३ ए (दोन समूहांत द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न) नुसार पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.