Monday, February 6, 2023

अहमदनगरमध्ये राजकीय वादातून गोळीबार; सरपंचाचा मृत्यू

- Advertisement -

टीम, HELLO महाराष्ट्र। पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे गावातील राजकीय वादातून झालेल्या गोळीबारात सरपंचाचा मृत्यू तर चार जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी असलेल्या सरपंच संजय बाबासाहेब दहिफळे (वय 50) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे पाथर्डी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

या घटनेत ज्ञानेश्वर अशोक दहिफळे (वय 30) हे गंभीर जखमी झाले आहेत. तर  भीमराज जिजाबा दहिफळे (वय 60), सदाशिव अर्जुन दहिफळे (वय 50) हे किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना अत्यवस्थ अवस्थेत अहमदनगर येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे. या घटनेतील मृत सरपंच संजय दहिफळे यांचे गावातीलच निवृत्त जवान शहादेव पंढरीनाथ दहिफळे यांच्याशी राजकीय वैर होते. या दोघांमध्ये पूर्वी अनेकवेळा वाद झाले होते.

- Advertisement -

मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास गावातीलच गोपीनाथ मुंडे चौकात दोन गटात मारामारी झाली. त्यात शाहदेव दहिफळे यांनी पिस्तूलमधून संजय दहिफळे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या असल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितली.यानंतर जखमींना पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून यातील गंभीर जखमींना नगर येथील दवाखान्यात हलवण्यात आले आहे. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे