हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| आज पुण्यामध्ये झालेल्या बैठकीत अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वात प्रथम पक्षाने सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्या नावाची घोषणा केली आहे. रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत. याबाबतची माहिती स्वतः अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. तसेच येत्या 28 तारखेला महायुतीचा संपूर्ण फॉर्मुला जाहीर करण्यात येईल, अशी ही माहिती त्यांनी दिली आहे.
आज झालेल्या बैठकीसाठी अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी हजर राहिले होते. आजच्या या बैठकीमध्ये बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी या लोकसभा मतदारसंघांविषयी चर्चा करण्यात आली. तसेच, महायुतीत बारामती लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसचच लढवणार, यावर सर्वांचे एकमत झाले. त्याचबरोबर, आज पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत राष्ट्रवादीकडून पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला.
याबाबतची माहिती देताना, लोकसभा निवडणुकीसाठी रायगडमधून सुनील तटकरे निवडणूक लढविणार आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले. परंतु, महायुतीत राष्ट्रवादीला नेमक्या किती जागा मिळाल्या आहेत? याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. यावेळी त्यांनी 28 तारखेला महायुतीचा फॉर्मुला जाहीर करण्यात येईल असे त्यांनी सांगितले आहे. अजित पवार म्हणाले की, “महायुतीत जागावाटपाचे 99 टक्के काम झाले आहे. आता 28 तारखेला मुंबईत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी पत्रकार परिषद घेऊन उमेदवार जाहीर करू”