हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मुंबई येथील एका उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आल्यानंतर भाजप आक्रमक झाली असून मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आपला राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप कडून करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांना विचारला असता त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा दाखला देत भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला.
संजय राऊत म्हणाले, टिपू सुलतानचं नाव दिलं म्हणून अस्लम शेख यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजप करत असेल तर भाजपने सर्वात आधी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घेतला पाहिजे. राष्ट्रपती कोविंद यांनी कर्नाटकाच्या विधानसभेत जाऊन टिपू सुलतानचा गौरव केला होता. त्यामुळे सर्वात आधी भाजपने त्यांचा राजीनामा घ्यावा असा टोला राऊतांनी लगावला.
भाजपच्या काही नेत्यांनी याप्रकरणावरून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. त्यावरून देखील संजय राऊत यांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. जे दंगलीची भाषा करत आहेत त्यांनी हिम्मत असेल तर दंगल करून दाखवावी. इथे ठाकरे सरकार आहे. दंगल करून दाखवाच, असा इशारा राऊतांनी दिला.