पावसाचा पहिला बळी : म्हैस सोडायला गेलेल्या 23 वर्षीय युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

मान्सूनपूर्व पावसाचा माण तालुक्याला जोरदार तडाखा बसला. विजेच्या कडकडाटासह आलेल्या वादळी पावसात गोट्यातील म्हैस सोडायला गेलेल्या 23 वर्षीय युवकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. हिंगणी (ता. माण) येथील शुभम सरतापे (वय- 23) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. या दुर्घटनेत म्हैशीचाही विजेचा शाॅक लागल्याने मृत्यू झाला. वादळी पावसाने माण तालुक्यातील पहिला बळी शुभमचा ठरला असुन या घटनेची नोंद म्हसवड पोलिसात झाली आहे.

घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह म्हसवडच्या बहुतांश भागात गुरुवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली. माण तालुक्यात गुरुवारी दुपारी चार वाजले नंतर ढगांची दाटी निर्माण झाली होती. सायंकाळी 5 वाजले पासून तुरळक पावसाला सुरुवात झाली. रात्री सात वाजता विजाचा कडकडाट व जोरदार पावसाने हजेरी लावली. हिंगणी येथे लालासो दाजी सरतापे (वय- 75) हे पत्नी, मुलगा सौरभ, दुसरा मुलगा शुभम हे एकत्र राहतात. रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान विजाचा कडकडाट व पावसाची धार सुरू होती. या वेळी जनावराच्या पत्र्याचे शेड असलेल्या गोट्यातून जनावरे ओरडत असल्याचा आवाज आल्याने शुभम जनावरे का ओरडतात म्हणून पहायला गेला. तर त्याच दरम्यान घराच्या मागील बाजूस असलेल्या ट्रान्सफार्मरवर (डिपीवर) वीज पडली. तेव्हा पत्र्याच्या गोट्याला वीजेचा प्रवाह लागल्याने जनावरांनी दावी तोडून गोट्यातुन बाहेर पडली होती.

म्हैशीचे दावे जाड असल्याने ते तुटत नव्हते, म्हैशीला विजेचा शाॅक लागत असल्याने ती जोर जोरात ओरडत होती. यावेळी शुभम तिच्या जवळ जाताना पत्र्याच्या शेडच्या लोखंडी अॅग्लला धरले. त्यावेळी त्याला जोरदार विजेचा शाॅक लागून तो खाली पडला. त्याच वेळी म्हैशीचाही विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. दहा मिनिटे झाली गोट्यात गेलेला शुभम येईना, म्हणून वडिल पावसात बॅटरी घेऊन पहावयास गेले. तेव्हा शुभम खाली पडला होता. तर शेजारी म्हैस ही पडलेली दिसली शुभमला हाका मारल्या तो उटत नसल्याने घरातील नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला.

ट्रान्सफार्मरवर वीज पडल्याने शाॅर्टसर्किट होऊन वीज प्रवाह पत्र्यावर आल्याने शुभमचा मृत्यू झाला. रात्री पाऊस पडत असल्याने व लाईट नसल्याने व म्हसवड पोलिसात तक्रार देण्यास वाहनांची अडचण निर्माण झाल्याने शुक्रवारी दि. 20 रोजी सकाळी शुभमचे वडील लालासो दाजी सरतापे यांनी म्हसवड पोलिसात वीज ट्रान्सफार्मरवर पडल्याने मुलाचा मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली. दहिवडी येथे शवविच्छेदन करून सांयकाळी 6 वाजता हिंगणी येथे शुभमवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आई- वडील, बहिण व एका भावाने हंबरडा फोडल्याने उपस्थिताचे डोळे पानावले.