वृद्ध शेतकऱ्याने रचले स्वत:चे सरण, दिवा लावून पूजा केली अन् स्वतःला जाळून घेतले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नागपूर : हॅलो महाराष्ट्र – नागपूर जिल्ह्यामधील कुही तालुक्यातील किन्ही या गावातील एका वृद्ध शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये स्वत:चे सरण रचले. त्यांनंतर त्याने पूजा करून स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली आहे. आत्माराम मोतीराम ठवकर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून ते 80 वर्षांचे होते. तसेच ते वारकरी असून, धार्मिक प्रवृतीचे होते. विशेष बाब म्हणजे मृत आत्माराम मोतीराम ठवकर यांनी आत्महत्येपूर्वी रचलेल्या सरणाशेजारी विधीवत पूजासुद्धा केली होती. या ठिकाणच्या भारत गॅस कंपनीचे मालक चिंधू ठवकर यांचे ते वडील होते. शेतात असलेल्या गॅस गोडाऊनच्या शेजारी त्यांचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळून आला होता. त्यांनी नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली हे अजून समजू शकलेले नाही. यानंतर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

काय घडले नेमके ?
घटनेच्या आदल्या दिवशी रात्री किन्ही येथे मंडईचे आयोजन करण्यात आले होते. त्या ठिकाणी आत्माराम ठवकर हे येथे झाडीपट्टी नाटक बघायला गेले होते. नाटक पाहून झाल्यावर ते पहाटे त्यांच्या शेतात आले. येथे त्यांनी शेतातील लाकडे गोळा केली. स्वतःसाठी लाकडांचे सरण रचले. त्यावर तणस टाकली. सरणाची पूजा केली. त्यानंतर ते सरणावर चढले आणि नंतर त्यांनी स्वतःला पेटवून घेतले.

मृत आत्माराम धार्मिक वृत्तीचे होते
सकाळी आत्माराम यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वेलतूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. याप्रकरणी वेलतूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नितेश डोर्लीकर करत आहेत. आत्माराम हे धार्मिक वृत्तीचे होते. वारकरी संप्रदायाचे अनुयायी होते. घरातील परिस्थिती चांगली असताना त्यांनी एवढा टोकाचा निर्णय का घेतला ? याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Comment