हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यात वैद्यकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक दुर्मिळ घटना घडली आहे. एका 32 वर्षीय गर्भवती महिलेच्या पोटातील बाळाच्या पोटातही अजून एक बाळ असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनात आले आहे. वैद्यकीय भाषेत याला “फिटस इन फिटो” (Fetus in Fetu) असे म्हणतात. भारतात आतापर्यंत अवघ्या 9 ते 10 अशा घटना घडल्या आहेत. बुलढाण्यात अशा प्रकारची घटना प्रथमच घडल्यामुळे सर्वांनाच याचे आश्चर्य वाटत आहे.
ही घटना 28 जानेवारी रोजी बुलढाणा जिल्हयातील महिला रुग्णालयात समोर आली. एक गर्भवती महिला नियमित तपासणीसाठी आली असता, डॉक्टरांनी तिला सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. तपासणीदरम्यान डॉक्टरांना तिच्या पोटातील बाळाच्या पोटातही अजून एक बाळ असल्याचे दिसले. त्यामुळे खात्री करण्यासाठी अन्य तज्ज्ञ डॉक्टरांनाही बोलावण्यात आले. तेव्हा ही बाब खरी असल्याचे सर्वांना समजले.
“फिटस इन फिटो” म्हणजे नेमके काय?
“फिटस इन फिटो” ही एक अत्यंत दुर्मिळ वैद्यकीय स्थिती आहे. गर्भधारणेदरम्यान काही वेळा दुहेरी गर्भधारणा (Twin Pregnancy) होत असते, पण त्यातील एक भ्रूण पूर्णपणे विकसित न होता दुसऱ्या भ्रूणाच्या आत वाढतो. ही एक प्रकारची “काँनजेनाईटल एबनॉर्मलिटी” (Congenital Abnormality) आहे. अनेकदा हे दुसरे बाळ पूर्ण विकसित नाही मात्र ते शरीरात काही अवयवांसह वाढत राहते.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात घडलेला हा प्रकार याचाच एक भाग आहे. या प्रकारच्या घटनांमध्ये जन्मल्यानंतर पोटात वाढलेल्या दुसऱ्या बाळामुळे नवजात शिशुला त्रास होऊ शकतो. त्यामुळे शस्त्रक्रिया करून हा वाढलेला भाग काढून टाकावा लागतो. मात्र, बुलढाणा रुग्णालयात अशा शस्त्रक्रियेसाठी आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध नसल्यामुळे महिलेला पुढील उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.




