हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| राजकिय वर्तुळातून नुकतीच एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत (Legislative Council by-election) सर्वच्या सर्व पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये भाजप (BJP), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उमेदवारांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, अपक्ष उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे.
अपक्ष उमेदवाराचा अर्ज अपात्र
या पोटनिवडणुकीसाठी एकूण सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, एका अपक्ष उमेदवाराकडे आमदारांच्या आवश्यक पाठिंब्याचे पत्र आणि नोटरी नसल्याने त्यांचा अर्ज अपात्र ठरविण्यात आला. त्यामुळे मैदानात उरलेले पाच उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.
बिनविरोध निवडून आलेले उमेदवार
या निवडणुकीत भाजपकडून माजी महापौर संदीप जोशी, माजी आमदार दादाराव केचे आणि प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांना संधी देण्यात आली होती. शिंदे गटाच्या शिवसेनेकडून चंद्रकांत रघुवंशी आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून संजय खोडके यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. हे पाचही उमेदवार बिनविरोधी निवडून आले आहेत.
दरम्यान, निवडणूक प्रक्रियेच्या नियमानुसार, २० मार्चपर्यंत अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे. त्यानंतर निवडणूक अधिकारी अधिकृतरित्या विजयी उमेदवारांची घोषणा करतील.
राजकीय पक्षांची रणनीती
या पोटनिवडणुकीत भाजपने तीन जागा मिळवून आपली ताकद दाखवून दिली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाला एक जागा मिळालीआहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपली उपस्थिती कायम राखली आहे. अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे कोणतीही चुरस न होता ही निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. यामुळे आता महाराष्ट्र विधान परिषदेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या संख्याबळावर कोणता प्रभाव पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.