कराड | मल्हारपेठ (ता.पाटण) येथे घरासमोरील वहिवाटीच्या कच्च्या रस्त्यावरून दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत ५ जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून मल्हारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयदीप मधुकर चव्हाण, यशोदिप चव्हाण, अंकुश चव्हाण, कलावती चव्हाण आणि नाडे, क्रांतीनगर येथील महिपती भिसे, महेश भिसे, वैभव भिसे, अनुसया भिल्ल व मालन चव्हाण (सर्व रा. मल्हापेठ) यांच्यात रस्त्याच्या वादावरून गुरुवार दि. २७ रोजी सांयकाळी जोरदार हाणामारी झाली. हातोडा, लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने झालेल्या मारहाणीत दोन्हीकडील पाच जण जखमी झाले आहेत.
जयदीप मधुकर चव्हाण (वय ३४) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, घराकडे जाणाऱ्या वहिवाटीच्या कच्च्या रस्त्यावर आम्ही मुरूम टाकत असताना शेजारील मालन नाना चव्हाण यांनी सदरच्या रस्त्यावर वाद घातला. यावेळी शिवीगाळी करून थोडा वेळ थांबा तुम्हाला सर्वांना बघून घेते अशी धमकी देऊन त्या घरी निघून गेल्या. त्यानंतर तेथे नाडे, क्रांतीनगर येथील महेश महिपती भिसे व त्याची आई अनुसया महिपती भिसे हे मोटरसायकलीवरून आले. महेश भिसे हा मोठ्याने ओरडून काम बंद कर असे सांगू लागला. तेवढ्यात त्याचे वडील महिपती भिसे व वैभव महिपती भिसे हे मोटरसायकलीवरुन या ठिकाणी आले. वैभव भिसे याने माझा भाऊ यशोदिप चव्हाण यास जोराचा धक्का देऊन खाली पाडले. तर महेश भिसे याने त्यास लोखंडी हातोडी मारली. यामध्ये यशोदिपच्या डोक्याला मार लागल्याने तो जखमी झाला आहे. तर महिपती भिसे यांनी मला लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. तसेच माझा लहान भाऊ अंकुश चव्हाण यास लाकडी फळीने मारहाण करून जखमी केले.
तर महेश महिपती भिसे (वय ३३) याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, जयदीप चव्हाण व त्याचे भाऊ रस्त्यावर भराव टाकत असून तुम्ही या असे माझी आजी मालन चव्हाण यांनी फोन करून सांगितल्यावर आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो. यावेळी मी व माझी आजी त्यांना समजावून सांगत असताना जयदीप चव्हाण याने बाजूला पडलेले फावडे माझ्या डोक्यात व पायावर मारले. तसेच सळईने मारहाण केली. त्यांच्या घरातील महिलांनी माझ्या आईला शिवीगाळ करून दगड फेकून मारले. मला व माझ्या आईला मारहाण करून जखमी केले. या प्रकरणांचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अजित पाटील करत आहेत.