Flight To Ayodhya । उत्तरप्रदेशातील अयोध्या येथील राम मंदिर (Ram Mandir Ayodhya) उदघाटनांनंतर देशभरातुन लाखो रामभक्त अयोध्येला जात आहेत आणि प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत आहेत. दिवसेंदिवस भक्तांचा आकडा वाढतच चालला असून त्या पार्श्वभूमीवर भाविकांना प्रवास आरामदायी व्हावा यासाठी देशभरातील ८ प्रमुख शहरामधून अयोध्येसाठी थेट विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. यामध्ये दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, जयपूर, पाटणा, दरभंगा, मुंबई आणि बेंगळुरू या शहरांचा समावेश आहे.
अयोध्या विमानतळ दरवर्षी 10 लाख प्रवाशांना हाताळू शकेल- Flight To Ayodhya
राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी अयोध्येतील महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ या नव्याने बांधलेल्या अयोध्या विमानतळाचे उद्घाटन केले होते. या विमानतळामुळे (Flight To Ayodhya ) कनेक्टिव्हीटी सक्षम तर होईलच परंतु अयोध्येतील आध्यात्मिक पर्यटनाला आणि रोजगाराला चालना सुद्धा मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ दरवर्षी 10 लाख प्रवाशांना हाताळू शकेल आणि दुसऱ्या टप्प्यानंतर हाच आकडा 60 लाख प्रवाशांच्या आसपास जाईल अशी अपेक्षा आहे. राम मंदिर आणि नवीन विमानतळ यामुळे उत्तरप्रदेशची वाटचाल देशातील सर्वात मोठं पर्यटन स्थळ होण्याकडे चालली आहे.
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 23 जानेवारीला राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. यावेळी देशातील ८००० हुन अधिक दिग्गज आणि लाखो रामभक्तानी उपस्थिती लावली होती. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्टेनंतर पहिल्या दिवशी सुमारे पाच लाख भाविक अयोध्या राम मंदिर परिसरात होते. त्यानंतर दररोज जवळपास २ लाख रामभक्त अयोध्येत येऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेत आहेत. राम मंदिर निर्मितीमुळे अयोध्येची पर्यटन क्षमता वाढली असून आर्थिक आणि सामाजिक विकासाचा नवा मार्ग तयार झाला आहे.