प्रणव पाटील
रोज दुपारी मी औंधच्या ब्रेमन चौकात सिग्नलसाठी थांबतो. तेव्हा रोज एक चित्र हमखास पाहतो त म्हणजे सिग्नलची गरीब मुलं हातात गुलाबांचा गुच्छ घेऊन उभे असतात. “फक्त दहा रुपये, दहा रुपये” करत सिग्नल चालू होईल या भितीने गाड्यांच्या मधल्या बेचक्यातून सरसर पळताना दिसतात. या रोज दिसणाऱ्या चित्रामुळे मी अनेक वेळा अस्वस्थ व्हायचो पण आता मात्र मला काहीही वाटत नाही. मी एका पांढरपेशा आणि कार्ल मार्क्सच्या दृष्टिकोनातून बुर्झव्वा गटातील असल्यामुळे या सर्वात खालच्या, कष्टकरी, शेतकरी, मजूर ,कारागीर यांच्या घामावरचा फायदा घेणारा वर्गातून असल्यामुळे मला आशा गरिबांचं चित्र समोर असूनही त्या बाबतीत काहीही करु वाटत नाही. कारण मला त्यात माझा फायदा दिसत नाही. मला त्यात माझं काही कर्तव्य आहे असंही वाटत नाही. सरकार आशा गोष्टींसाठी काय ते काम करेल ही त्यामागची भावना असते.
प्राचीन काळात भले भारतात सोन्याचा धूर निघाला असेल पण तेवढिच गावकुसा बाहेर असणारी अमानवी अस्पृश्य प्रथा असणारी काजळी ही त्या इतिहासात पानोपानी पसरलेली आहे. मला काय या चकचकीत आणि गचाळ शहरातील रस्त्यावर फिरणारे दरिद्री, पुलाखाली राहणारे भटके, नदीपात्रात झोपडपट्टीत राहणारे दलित, मुस्लिम माझे भाऊ बंध वाटतात का? सध्या तरी मुळीच नाही. असं का होतयं. धावपळीच्या जगात आपल्या वेगाला जुळवून न घेऊ शकणारे मागे पडलेले वेगळे झालेले दिसतात. मला अजून आठवतं मी आशा वस्तींमधे गेलो, तर मला नवे मोबाईल, TV असे अधुनिक बाज असलेला मध्ययुगीन समाज दिसतो. जो अजूनही कुठेतरी हळूवारपणे आपल्या जून्या कोषातून बाहेर पडताना दिसत आहे. तर दुसरीकडे असाही समाज, मित्र मैत्रिणी आहेत ज्यांचा वावर भारतात असला तरी मनाने ते अमेरिकेत असतात. तसाचा त्यांचा पोषाख,विचार,आणि वागणं. आजही कुठेतरी इंडीया च्या खूप मागे भारत आहे. जो भारत रोज डोळ्यांना दिसतो पण मनात मात्र जाणूनबुजून इंडीया चं फक्त दिसेल अशी व्यवस्था सर्वत्र आहे.
खरंतर अर्थव्यवस्थेतील अतिशय कटू सत्य जे कार्लमार्क्स सांगतो ते म्हणजे अतिउच्च श्रीमंतांचे पाय हजारो हातांवर उभे असतात. एका पातळी नंतर पैसा पैशाला खेचतो. काय भारतात एक दिवस या दोन्ही चित्रांची कल्पना शक्य आहे का? गरीब आजही त्या परिस्थितीतच का आहे? श्रीमंत अजून का श्रीमंत होत आहेत? परवा आपल्या देशाने जगाच्या अर्थ व्यवस्थेमधे ६व्या स्थानावरुन फ्रांन्सला मागे टाकत ५ वे स्थान गाठलं म्हणून काय आनंद झाला !!! पण काय आपण खरचं सर्वसमावेशक प्रगती केली आहे काय? युरोपीयन वृत्तपत्रांनी या गोष्टींची खिल्ली उडवली आणि सांगितलं की फ्रान्स मधे प्रति व्यक्ती उत्पन्न ३७,५००डॉलर आहे तर भारतात तेच प्रति व्यक्ती उत्पन्न फक्त १,७00 डॉलर आहे .मग तरीही भारत यात पुढे कसा? कोणत्या ठराविक समुहाचे उत्पन्न सतत वाढत आहे? काय ३% लोकांकडे आपल्या देशाची ७०% संपत्ती आहे ?
या ३% लोकांच्या हातात सत्ता, मिडीया, शिक्षणसंस्था, मनोरंजनाची साधने एकवटलेली आहेत. त्यामुळे नकळत माझ्या देशाच्या उत्थाना करिता असणाऱ्या जाणिवा कापल्या गेल्या आहेत ?
काय आपण फुलांसाठी कुण्याच्या तरी हातात काटे दिले आहेत का? आज तरी मला स्वतः हून या लोकांसाठी काहीही करावं वाटत नाही कारण नकळत माझं आणि पर्यायाने माझ्याकडून कुणाचं तरी आर्थिक शोषण होत आहे.ही साखळी सगळ्या भोवाती जेवढी घट्ट असेल तो पर्यंत मला काटे असूनही फक्त टवटवीत,लाल फुलंच दिसतील.
प्रणव पाटील
9850903005