हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा नेहमीच युवा खेळाडूंना पाठिंबा देत असतो. कोणतेही टेन्शन न देता नव्या खेळाडूंना पूर्ण स्वातंत्र्य रोहितच्या नेतृत्वाखाली मिळत असते. आजपर्यंत रोहितने अनेक नवे खेळाडू घडवले आहेत. सर्वांशी हसतखेळत राहणारा रोहित त्यामुळेच प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. आता टीम इंडियाचा युवा फलंदाज सर्फराज खान (Sarfaraz Khan) यानेही आपल्या कर्णधाराचे तोंडभरून कौतुक केलं आहे. रोहित शर्मा म्हणजे माझ्यासाठी लगान चित्रपटातील आमिर खान आहे असं सर्फराजने म्हंटल.
जिओ सिनेमावर बोलताना सर्फराज खान म्हणाला, माझा आवडता चित्रपट लगान आहे आणि त्यात आमीर खानने ज्या पद्धतीने काम केले आहे, अगदी तसेच मला रोहितकडे बघितल्यानंतर वाटत. जेव्हा मी रोहित भाई कडे बघतो तेव्हा मला तो लगान चित्रपटाची आमिर खान वाटतो, माझ्यासाठी तो लगान मधील आमिरच आहे. त्याच्यासोबत असताना आपल्या कुटुंबातीलच कोणीतरी आहे असं फील होते. तो नेहमीच मला मोठ्या भावासारखा वाटतो. रोहितला बघण्यात आणि त्याच्यासोबत खेळण्यात एक वेगळीच मजा येते. रोहित कधीही ज्युनिअर- सिनिअर भेद करत नाही, तर सर्वाना समान वागवतो. रोहित शर्मा खूप सकारात्मक बोलतो, आणि हिंमत देतो. त्याच्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढतो असं म्हणत सर्फराज खानने रोहितवर स्तुतिसुने उधळली.
दरम्यान, 26 वर्षीय सरफराज खानने भारतासाठी आतापर्यंत 3 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 5 डावात 200 धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्येही सर्फराजने दमदार कामगिरी केली आहे. सरफराजने फर्स्ट क्लासमध्ये ४१६७ धावा, लिस्ट ए मध्ये ६२९ धावा आणि टी-२० मध्ये ११८८ धावा केल्या आहेत. याशिवाय आयपीएलचे ५० सामनेही ती खेळले असून त्यात त्याने ५८५ धावा केल्या आहेत. 19 सप्टेंबरपासून, बांगलादेशविरुद्ध च्या कसोटीसाठी सर्फराजची संघात निवड करण्यात आली असून त्याच्याकडून टीम इंडियाला मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.