औरंगाबाद | स्मार्ट सिटीतून शहरात कोट्यावधी रुपयांची कामे सुरू आहेत. आतापर्यंत स्मार्ट सिटीच्या खर्चाचे बाह्य लेखापरीक्षण झालेले नाही. म्हणून आता हे लेखापरीक्षण करण्याची विनंती औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट बोर्डाकडून नागपूर येथील महालेखापाल कार्यालयाकडे करण्यात आली आहे. त्यासाठी नुकतेच पत्र देण्यात असल्याची माहिती स्मार्ट सिटीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांनी मंगळवारी दिली.
पाच वर्षापूर्वी केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराची निवड झाली. त्यानंतर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना करून तिची कंपनी कायद्यांतर्गत नोंदणी करण्यात आली. औरंगाबाद स्मार्ट सिटीला विविध प्रकल्पासाठी एकूण 1 हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. आतापर्यंत 500 कोटीहून अधिक निधी प्राप्त झाला असून मागील चार वर्षात यातील बराचसा निधी खर्चही झाला तरीदेखील आतापर्यंत या खर्चाचे बाह्य लेखापरीक्षण झालेले नाही.
त्यामुळे आता स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपा प्रशासन आस्तिककुमार पाण्डेय यांच्या स्वाक्षरीने नागपूर येथील महालेखापाल यांना एक पत्र देण्यात आले आहे. त्यात स्मार्ट सिटीच्या खर्चाचे ऑडिट करण्याची विनंती करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीचे यापूर्वी दोन वेळा अंतर्गत लेखापरीक्षण झालेले आहे. पण बाह्य लेखापरीक्षण ही गरजेचे असते त्यामुळे तसे पत्र दिले आहे. अशी माहिती अरुण शिंदे यांनी दिली.