परदेशी महिलेचा पुणे- बंगलोर महामार्गावर गोंधळ; पोलिसांनाही दिला चकवा अन्..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | पुणे- बंगलोर महामार्गावर प्रवासात संतुलन बिघडल्याने एका परदेशी महिलेने मोठा गोंधळ घातला. प्रवासात बसमधून खाली उतरून तिने पलायन केले, मात्र, या दरम्यान महामार्गावरील धावत्या वाहनाला धडकल्याने महिला जखमी झाली. महिलेवर भुईंज पोलिसांनी उपचार करून तिला न्यायालयाच्या आदेशाने येरवडा मनोरुग्ण रुग्णालयात दाखल केले आहे. नाबूनजीओ लाँय बीरुनगी (वय- 40, रिपब्लिक ऑफ युगांडा) असे तिचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, युगांडा येथील महिला पर्यटनासाठी भारतात आली आहे. बंगळूर ते मुंबई प्रवासात महामार्गावर वाई तालुक्यातील बोपेगावनजीक तिचे मानसिक संतुलन बिघडल्याने ती बस चालकाशी हुज्जत घालू लागली. तसेच ती महिला बसमधून खाली उतरून एका हॉटेलमध्ये लपून बसली होती. हॉटेल व्यवस्थापनाने भुईंज पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. घटनास्थळी पोलिस आल्याचे पाहून ती महामार्गावरून पळू लागली. पळताना महामार्गावरील धावत्या वाहनाला धडकून रस्त्यावर पडून जखमी झाली.

भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी महिलेला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती कोणत्याही परिस्थितीत समजून घेत नव्हती. तिने पोलिस ठाण्यातूनही दोन वेळा पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिला न्यायालयात नेले असता न्यायालयाने तिला पुणे येथील येरवडा मनोरुग्ण रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले. सहायक पोलिस निरीक्षक निवास मोरे, हवालदार घाडगे यांनी येरवडा येथील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, युगांडाच्या भारतीय दूतावासाशी संपर्क साधून महिलेबाबत तिच्या नातेवाईकांना कळविण्याबाबत संदेश दिला आहे.

Leave a Comment