Wednesday, March 29, 2023

भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना अटक; गजा मारणे कनेक्शन उघड

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : माजी खासदार संजय काकडे यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. कुख्यात गुन्हेगार गजानन मारणे याने तुरुंगातून सुटल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे वर शेकडो कारचा सहभाग असलेली रॅली काढली होती. या प्रकरणात दाखल गुन्ह्यात ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

कुख्यात गुंड गजानन मारणे याने तळोजा तुरुंगातून सुटल्यावर जंगी मिरवणूक काढली होती. मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर काढलेल्या या मिरवणुकीत शेकडो कार होत्या. त्यानंतर सोशल मीडियावरून त्याचे फोटो व व्हिडिओ व्हायरल केले होते. या प्रकरणी गुन्हे शाखेकडून तपास करून बंडगार्डन पोलीस ठाण्यात गजानन मारणेसह इतरांवर गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात काकडे यांना चौकशीसाठी बोलावले होते. बुधवारी सकाळी बंडगार्डन पोलिसांनी काकडे यांना अटक केली.

- Advertisement -

यापूर्वीही काकडे यांना गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मागील वर्षी नोव्हेंबरमध्येही काकडे यांना अटक केली होती. मेहुण्याला धमकावल्याप्रकरणी काकडे, त्यांची पत्नी उषा काकडे यांना चतुःश्रृंगी पोलिसांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची जामिनावर सुटका झाली होती.