कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी साेमवारी रात्री काढलेल्या लाॅकडाउनच्या आदेशाच्या विरोधात शहरातील व्यापारी रस्त्यावर उतरले. शहरातील मुख्य बाजारपेठेतील सराफ, कापड, हार्डवेअर, हाॅटेल व्यावसायिकांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. यापूर्वीच्या लाॅकडाउनमुळे व्यापाराचे कंबरडे मोडले आहे. त्यात नव्याने लाॅकडाऊन झाल्याने व्यवसायिक पूर्ण बरबाद होणार आहे. तरी लाॅकडाउनमध्ये शिथिलता द्यावी, अशी मागणी यावेळी व्यापाऱ्यांनी केली.
व्यापाऱ्यांच्या या मागणीवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जिल्हाधिकारी तसेच मुख्यमंत्र्यांना तुमच्या समस्या मांडतो असे आश्वासन दिले आहे. यावेळी व्यापाऱ्यांतर्फे जितेंद्र ओसवाल, नितीन ओसवाल, चेतन मेहता, राहुल शहा, अमीत पाटणकर , बाळासाहेब भंडारी, मोहसीन बागवान, अशिर बागवान, अंकुर ओसवाल यांनी व्यापाऱ्यांची बाजू मांडली. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी 30 एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे आदेश जारी केला. त्यामुळे व्यापाऱ्यांत तीव्र नाराजी परसली आहे. त्यामुळे त्यांनी लॉकडाउनला विरोध दर्शवला आहे. दुकाने काही वेळ सुरू ठेवण्यास सवलत मिळावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन केली.
यावेळी व्यापारी म्हणाले, शुक्रवार ते रविवार दुकाने बंद ठेवण्यास व्यापाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा होता. तेव्हा असे असताना संपूर्ण आठवडाभर दुकाने बंद ठेवण्याचा आदेश अचानक दिला आहे. व्यापाऱ्यांना रोज दुकाने काही वेळ सुरू करण्यास परवानगी मिळावी, जेणेकरून आमचा व्यवसाय व आम्हीही जगू अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. व्यापाऱ्यांच्या भावना पाहून आमदार चव्हाण यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलू असे आश्वासन व्यापाऱ्यांना दिले.