Wednesday, June 7, 2023

माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून कराड शहरातील जळीतग्रस्त वस्तीची पाहणी

कराड: कराड शहरातील टाऊन हाॅल शेजारील वेश्या वस्तीत काल मध्यरात्री आग लागून सुमारे 25 घरे जळून खाक झाल्याची घटना घडली होती. या घटनास्थळी आज माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट देऊन जळीतग्रस्त भागाची पाहणी केली. मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडून आ. चव्हाण यांनी माहिती घेतली

यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी तेथील रहिवाशांची विचारपूस केली, या वस्तीमधील लोकांची तात्पुरत्या स्वरूपाची राहण्याची व जेवणाची सोय तातडीने करण्याची व्यवस्था करत उपस्थित अधिकारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना तश्या सूचना दिल्या. नगरपरिषद प्रशासनाने योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचना मुख्याधिकारी यांना आ. चव्हाण यांनी दिल्या.

तहसीलदारांनी व मुख्याधिकाऱ्यांनी तातडीने पंचनामा करुन शासनाकडून लवकरात लवकर नुकसानग्रस्तांना मदत देण्याबाबत प्रयत्न करावेत अशा सूचना हि यावेळी देण्यात आल्या. याप्रसंगी कराड शहर काँग्रेस अध्यक्ष तथा नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, इंद्रजित गूजर, अशोकराव पाटील, प्रदीप जाधव, मुख्याधिकारी रमाकांत डाके आदींसह स्थानिक नागरिक उपस्थित होते.