पिंपरी चिंचवड : हॅलो महाराष्ट्र – पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे माजी उपमहापौर आणि विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांना पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. केशव घोळवे यांच्यावर पिंपरी चिंचवड शहराच्या मुख्य बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना मेट्रोचे गाळे मिळवून देण्याचे आमिष दाखवून 55 हजार रुपये लुटल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच केशव घोळवे यांनी 2019 पासून अनेक व्यापाऱ्यांकडून भाजप कामगार आघाडी महाराष्ट्र प्रदेश या संघटनेसाठी 1200 रुपयांची पावती करण्यास भाग पाडले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
केशव घोळवे यांनी फिर्यादी व्यापाऱ्याकडून 55000 हजार रुपयांची खंडणी गोळा केली होती. त्यानंतर देखील केशव घोळवे फिर्यादीकडे एक लाख रुपयांची मागणी करत होते. पण संबंधित व्यापाऱ्याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्या व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली. मोहम्मद तय्यब अली शेख असे फिर्यादी व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांनी पैसे देण्यास विरोध केला असता, घोळवे यांनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप मोहम्मद तय्यब अली शेख यांनी केला आहे.
जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर व्यापारी मोहम्मद शेख यांनी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरुद्ध तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा भाजपचे विद्यमान नगरसेवक केशव घोळवे यांच्यासह गुड्डू उर्फ प्रमोद यादव, मलका यादव, घनश्याम यादव आणि हसरत अली शेख यांना अटक केली. तर दुसरीकडे केशव घोळवे यांच्यावर लावलेले सर्व आरोप खोटे असून त्यांना या प्रकरणात गोवलं जात असल्याचा आरोप भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्षा उमाताई खापरे यांच्याकडून करण्यात आला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हि कारवाई करण्यात आल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.