मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग चौकशीसाठी मुंबईत दाखल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर काही गुन्हे दाखल असून ते त्यांना फरार घोषित करण्यात आले होते. अखेर परमबीर सिंह मुंबई गुन्हे शाखेच्या कांदिवली कार्यालयात ते आज हजर झाले आहेत. परमबीर सिंह यांच्याविरोधात सध्या पाच खंडणीचे वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापैकी गोरगांव येथील खंडणी प्रकरणाचा तपास करणार्‍या गुन्हे अन्वेषण विभागाने परमबीर यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते.

सर्वोच्च न्यायालयाने अटकेपासून संरक्षण मिळताच परमबीर सिंह चंदीगडमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर परमबीर सिंह यांनी लवकरच मुंबईत येऊन तपास यंत्रणांना चौकशीत सहकार्य करणार असल्याचे माध्यमांना सांगितले होते. त्यानुसार ते आज मुंबईत चौकशीसाठी दाखल झाले आहेत. व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याच्या कथित गुन्ह्यात आरोप म्हणून परमबीर सिंह यांना मुंबईतील अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी न्यायालयाने फरार घोषित केले होते.

परमबीर यांच्याबरोबरच आरोपी निलंबित पोलिस अधिकारी रियाज भाटी व विनय सिंह उर्फ बबलू यांनाही न्यायालयाने फरार घोषित केले. परमबीर सिंह 30 दिवसांत न्यायालयात हजर न झाल्यास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अर्जाप्रमाणे व न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे त्यांची संपत्ती जप्त होण्याची कायदेशीर कारवाई सुरू होऊ शकते.

 

You might also like