माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तत्पुर्वी सकाळी नऊ ते दुपारी बारा वाजेपर्यंत प्रणव मुखर्जींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी राजाजी मार्ग इथं ठेवण्यात येणार आहे. दरम्यान त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद दहा वाजेच्या दरम्यान राजाजी मार्ग इथं पोहोचणार आहेत.

माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जीं यांच्या निधनानंतर राष्ट्रपती भवन आणि संसदेतला झेंडा अर्ध्यावर आणला गेला आहे. प्रणव मुखर्जींच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे. तर पश्चिम बंगालच्या ममता सरकारने देखील १ दिवसाचा शोक घोषित केला आहे. सर्व सरकारी कार्यालयं आज बंद राहणार आहेत. राज्य पोलीस दिनाचा कार्यक्रम २ सप्टेंबरपर्यंत स्थगित करण्यात आला आहे.

भारताच्या सर्वाधिक सन्मानित नेत्यांमध्ये प्रणव मुखर्जी यांचं देखील नाव असायचं. (Pranab Mukherjee) प्रणव मुखर्जी यांचं सोमवारी संध्याकाळी निधन झालं. ते ८४ वर्षांचे होते. मुखर्जी यांना १० ऑगस्ट रोजी लष्कराच्या रिसर्च अँड रेफ्रल हास्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या मेंदूची शस्त्रक्रिया झाली होती. त्यांच्या मागे त्यांचे ३ मुलं आणि १ मुलगी असा परिवार आहे. काँग्रेसचे एक वरिष्ठ नेते आणि ७ वेळा ते खासदार राहिले आहेत. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

१९८२ मध्ये ते भारताचे सर्वात युवा अर्थमंत्री बनले. तेव्हा ते ४७ वर्षांचे होते. त्यानंतर परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री आणि अर्थ व वाणिज्य मंत्री असे अनेक महत्त्वाचे विभाग त्यांनी सांभाळले. ते देशाचे असे पहिले राष्ट्रपती होते ज्यांनी इतके पदं भूषवली होती. मुखर्जी भारतातील एकमेव असे नेते होते जे पंतप्रधान नसताना देखील ८ वर्ष लोकसभेचे नेते राहिले. १९८० ते १९८५ दरम्यान ते राज्यसभेत काँग्रेसचे नेते होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.