हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना ताप आल्यामुळे नुकतंच उपचारासाठी दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डॉक्तरांकडून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे. एम्समध्ये उपचार घेत असलेले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग याची प्रकृती स्थिर असल्याचे एम्सच्या सूत्रांनी सांगितले.
डॉ. सिंग हे डॉक्टरांच्या देखरेखीखाली असून त्यांच्या तपासण्या सुरू आहेत. त्यांनी नवे औषध घेतल्यानंतर त्यांच्या शरीरात काही प्रमाणात रिअॅक्शन झाली होती. त्यानंतर ताप येऊ लागला, असे सूत्रांनी सांगितले. ८७ वर्षीय डॉ. सिंग यांना रविवारी अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. डॉ. सिंग यांच्या शरिरात औषधाचे रिअॅक्शन कसे झाले. त्यांना ताप येण्याची आणखी काही कारणे आहेत का, याचीही तपासणी करण्यात येत आहे.
डॉ. मनमोहन सिंग हे राज्यसभेचे सदस्य आहेत. ते राजस्थानमधून राज्यसभेवर आले आहेत. ते सन २००४ ते २०१४ या कालावधीत देशाचे पंतप्रधान होते. डॉ. सिंग यांच्यावर हृदयाची यशस्वी बायपास सर्जरी करण्यात आली होती. डॉ. सिंग यांची प्रकृती लवकरात लवकर ठणठणीत व्हावी अशा सदिच्छा अनेक नेत्यांनी दिल्या आहेत.
देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येत रोज विक्रमी भर पडताना दिसत आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णसंख्येने दरदिवशी दोन लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे देशातील आरोग्य यंत्रणेवर ताण येत असून लसींचा तुटवडा, ऑक्सिजनचा पुरवठा कमी तसेच रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचा तुटवडा, बेड्सची अपुरी संख्या अशा अनेक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्शवभूमीवर काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक पत्र लिहिले होते.