संकल्पपूर्ती : किल्ले वसंतगडावर बुरुज, तटबंदीची पुनर्बांधणी पूर्ण, लोकार्पण सोहळा उत्साहात

कराड | किल्ले वसंतगडावरील पश्चिम दरवाज्याच्या बाजूकडील बुरुजासह तटबंदीचा काही भाग अतिवृष्टीमुळे ढासळला होता. त्याची डागडुजी व पुनर्बांधणी करून संवर्धन करण्याचा संकल्प सह्याद्री प्रतिष्ठान व टीम वसंतगडच्या दुर्गसेवकांनी केला होता. तो संकल्प पूर्णत्वास नेत बुरुज, तटबंदीची पुनर्बांधणी पूर्ण करून नुकताच त्याचा दुर्गार्पण सोहळाही उत्साहात संपन्न झाला.

या दुर्गार्पण सोहळ्यासाठी गडावर जमलेल्या शेकडो दुर्गसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार, हर हर महादेवच्या गर्जना आणि येळकोट… येळकोट जय मल्हारच्या गजराने संपूर्ण वसंतगड दणाणून टाकला. तसेच दुर्गसेवकांनी भंडाऱ्याची उधळण करत संकल्पपूर्तीचा आनंदोत्सवही साजरा केला.

दरम्यान, रविवारी १६ रोजी सकाळी श्री चंद्रसेन महाराजांच्या मंदिरात पूजा करण्यात आली. त्यानंतर तुतारीच्या निनादात व हलगीच्या तालावर छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक काढून  शिवरायांच्या मूर्तीला गडावरील कृष्णा व कोयना तळ्यातील पाण्याने अभिषेक घालण्यात आला. त्याचबरोबर गडाच्या पश्चिम दरवाजात पालखी आल्यानंतर उपस्थित शिवप्रेमी, दुर्गप्रेमी व दुर्गसेवांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा, आई तुळजा भवानीचा जयजयकार केला. तसेच दरवाजाच्या डाव्या बुरुजासह तटबंदीवर असलेल्या मावळ्यांनी महाराजांच्या पालखीवर भांडाऱ्याची उधळण करत मल्हारीचा येळकोट केला. भंडाऱ्याच्या उधळणीत किल्ले वसंतगड अक्षरशः न्हाऊन निघाला होता. यावेळी गडावरील वातावरण पूर्णपणे शिवमय झाले होते.

गेले दीड-दोन वर्षांपासून वसंतगडाच्या संवर्धनासाठी सह्याद्री प्रतिष्ठान व टीम वसंतगडच्या दुर्गसेवक मावळ्यांनी बुरुजाचे टनभर वजनाचे पाषाण बांधकामस्थळी नेेणे, पुरातत्व खात्याच्या निकषांनुसार संपूर्ण बांधकाम चुन्यात पूर्ण करणे, त्यासाठी शिवकालीन दगडी चुन्याचा घाना सुरू करून त्यामध्ये चुन्याची मळणी करणे, त्या मिश्रणासाठी लागणारे सगळे साहित्य तटबंदीपर्यंत वाहून आणणे, लोकसहभाग व देणगी स्वरूपात स्वराज्य निधी उभारणे आदी. दिव्य पार पडणाऱ्या सर्व मावळ्यांचा या सोहळ्यानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.