हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| पर्यटन व्यवसायाला जागतिक स्तरावर नेणारे 'केसरी टूर्स'चे (Kesari Tour's) संस्थापक अध्यक्ष केसरी पाटील (Kesari Patil) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले आहे. शनिवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण पर्यटन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. केसरी पाटील यांच्यामुळेच केसरी टूर्सची ओळख जगभरामध्ये झाली होती.
केसरी पाटील यांनी वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी ‘केसरी टूर्स’ची स्थापना केली होती. तेव्हापासून ते आत्तापर्यंत केसरी टूर्सने अनेक पर्यटकांना जगातील विविध कोपरे दाखवले. या नावलौकिक व्यवसायामुळेच केसरी पाटील यांना पर्यटन क्षेत्रीतील एक विद्यापीठ मानले जात होते. आज जगभरात ‘केसरी’ हे नाव प्रतिष्ठेचे मानले जाते. या यशामागे केसरी पाटील याचीच मेहनत होती.
दरम्यान, केसरी पाटील यांच्या निधनामुळे संपूर्ण उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक दिग्गज, राजकीय नेते, उद्योजक आणि पर्यटन क्षेत्रातील मान्यवर त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे पार्थिव शनिवारी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत त्यांच्या बांद्रा येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.




