कोल्हापूर | भुदरगड तालुक्यातील मेघोली लघू पाटबंधारे तलाव बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास फुटल्याची घटना घडली आहे. तलाव फुटल्याने पुराच्या पाण्यात बुडून नवले येथील जिजाबाई धनाजी मोहिते या महिलेसह चार जनावारांचा मृत्यू झाला. तलावाच्या बांधातील माती, दगड, गोटे वाहून ओढ्याकाठच्या शेतीत पडल्याने शेकडो एकर शेतीसह पिकांचे नुकसान झालेले आहे.
बुधवारी रात्री 9. 45 वाजता सुमारास मोठ्या प्रमाणात पाणी ओढ्याला पाणी वाढल्यामुळे ग्रामस्थांना तलाव फुटला असल्याची शंका आली. ग्रामस्थांसह अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती मेघोली, वेंगरूळ, ममदापूर, तळकरवाडी, सोनुर्ली या गावांना देऊन सतर्क केले. मात्र, नवले येथील धनाजी मोहिते, त्यांची पत्नी जिजाबाई, मुलगा नामदेव ओढ्या शेजारील जनावारांच्या गोठ्यात जनावरे सोडण्यासाठी गेले होते. यावेळी जिजाबाई पाण्यातून वाहून जाऊन बुडून मृत्यू झाला. तर मुलगा नामदेव मोहिते झाडांचा आधार घेत बचावला. त्यांच्या चार जनावारांचा अद्याप शोध लागलेला नाही. निवृत्ती मोहिते यांच्या जनावारांच्या गोठ्यातील तीन म्हशी व एक बैल दगावला. चार मोटरसायकल वाहून गेल्या आहेत.
मेघोली तलाव 1996 साली बांधण्यास सुरूवात झाली होती. या तलावातून 2000 साली प्रथम पाणीसाठा करण्यात आला. मात्र सुरूवातीपासूनच या तलावाला गळती लागली होती. तलावाची गळती काढावी यासाठी या परिसरात शेतकऱ्यांनी वारंवार मागणी केली होती. मात्र याकडे कायमच दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उदभवल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गारगोटी- वेसर्डे रोडवरील वेंगरूळ जवळचा पूल पाण्याच्या प्रवाहाने वाहून गेल्याने या मार्गावरून वेसर्डे, नवले, आजरा या ठिकाणी होणारी वाहतूक बंद झाली आहे. आमदार प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी राहूल रेखावार, तहसिलदार अश्विनी अडसुळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.