भीषण अपघातात चार राष्ट्रीय हॉकीपटूंचा करुण अंत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी। मध्य प्रदेशमध्ये झालेल्या भीषण अपघातात राष्ट्रीय स्तरावरील चार हॉकीपटूंना प्राण गमवावे लागले, तर तिघे जण गंभीर जखमी आहेत. ध्यानचंद्र ट्रॉफी खेळण्यासाठी जाताना हा अपघात घडला. मध्य प्रदेशातील होशंगाबादजवळ आज (सोमवारी) सकाळी हा अपघात झाला.

ध्यानचंद करंडक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी हॉकीपटू कारने निघाले होते. इटारसीहून होशंगाबादच्या दिशेने जाताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६९ वर राईसलपूरजवळ त्यांची कार झाडावर धडकली.ही धडक इतकी भीषण होती, की चौघा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर तिघे जण जखमी आहेत. जखमींना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या काही खेळाडूंची राहण्याची व्यवस्था इटारसी इथं करण्यात आली होती. तिकडे जातानाच ही दुर्घटना घडली. शाहनवाझ खान, आदर्श हरदुआ, आशिष लाल व अनिकेत अशी मृत खेळाडूंची नावं आहेत. जखमी खेळाडूंची ओळख पटविण्याचं काम सुरू आहे. होशंगाबाद प्रशासनानं या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. दरम्यान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. चौहान यांनी मृत खेळाडूंची नावं ट्विट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, असं ट्विट त्यांनी केलं आहे.