सुपनेतील कोयना नदीवरील पाणी पुरवठा संस्थेतील चार सदस्य अपात्र

कराड | सुपने (ता.कराड) येथील कोयना नदीवरील समृद्धी सहकारी पाणी पुरवठा मंडळी लि. सुपने या संस्‍थेची पंचवार्षिक निवडणूक दोन वर्षापूर्वी बिनविरोध झाली होती. यामध्ये एकूण 13 सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तथापि, बिनविरोध निवडून आलेल्‍या सदस्‍यांपैकी एकूण 4 सदस्‍यांना संस्‍थेच्या कमांड एरियामध्ये जमीन नसल्‍याची तक्रार करण्यात आली होती. त्याची दखल घेवून जिल्‍हा उपनिबंधक सहकारी संस्‍था, कराड यांनी चाैघांना अपात्र ठरवले आहे.

उपनिबंधक सहकारी संस्‍था, कराड यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, सदर प्रकरणी कायदेशीर सत्‍यता पडताळून महाराष्‍ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 मधील कलम 73 क अ आणि महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था नियम 1961 मधील नियम 58 नुसार बिनविरोध झालेले सदस्य विनायक भगवान पाटील, प्रविण नानासाो पवार, मधुकर सिताराम जाधव, श्रीमती मंगल जगन्नाथ पाटील या चार सदस्‍यांना संस्‍थेच्या संचालक मंडळामधून संचालक पदावरून अपात्र ठरविण्याचा आदेश संस्‍थेस दिनांक 21/12/2021 रोजी दिला आहे.

सदर आदेशामुळे बिनविरोध निवडून आलेल्‍या सदस्‍यांवर अपात्रतेची नामुष्‍की ओढावली आहे. ज्‍या संचालकांना संस्‍थेच्या कार्यक्षेत्रात जमीनच नाही, असे लोक संस्‍थेचे सभासद झालेच कसे, अशी चर्चा सुपने परिसरात सुरू झाली आहे. चुकीच्या पध्दतीने संचालक मंडळावर घेतलेल्या या संचालकाविरूध्द उघडकीस आणणेकामी सुपने, ता.कराड येथील शेतकरी सर्वश्री बाबासाहेब पाटील, शिवाजी पाटील, राहूल पाटील, गणेश पाटील, आनंदराव पाटील, राजकुमार पाटील, अजित देसाई, गणेश माळी, विजय माळी, अजित जाधव  आदींनी विशेष प्रयत्‍न केले. तर संस्‍थेच्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणीही केली जात आहे.

You might also like