सातारा जिल्ह्यात खळबळ : आफ्रिकेतून आलेल्या चौघांना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा । सध्या राज्यावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमीक्रॉनचे संकट उभे राहिले आहे. भारतातही कोरोनाचे रुग्ण आढळत असून यापैकी सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यात कोरोनाचा नवा विषाणू ओमीक्रॉन याचे रुग्ण ठिकठिकाणी आढळून आले आहे. दरम्यान आज सातारा जिल्ह्यातील फलटण शहरामध्ये आफ्रिकेतील युगांडा येथून आलेले एकाच कुटुंबातील चौघे जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या चौघांना ओमिक्रॉनची लागण झाल्याच्या शक्यतेने शहरांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने तत्काळ खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, फलटण शहरातील एकाच कुटूंबातील पॉझिटिव्ह आलेल्या चौघा जणांमध्ये पती, पत्नी आणि दोन लहान मुले याचं समावेश आहे. ते काल रविवारी परदेशातून फलटण मध्ये आले होते. याची माहिती प्रशासनाला समजताच प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांची तत्काळ कोरोना टेस्टही केली होती. त्याचा रिपोर्ट तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. तो आज प्राप्त झाला असून संबंधितांचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला असून त्यांना ओमायक्रॉनची लागण झाली का नाही? याची शक्यता प्रशासनाकडून पडताळून पाहिली जात आहे. दरम्यान संबंधित रुग्णांचे रिपोर्ट मुंबई, पुण्यात प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत.

संबंधित कुटूंबीय हे दि. 9 डिसेंबर रोजी आफ्रिकेतील युगांडा वरून मुंबईला आले होते. त्यावेळी विमानतळावर उतरल्यावर त्यांची कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. तरीसुद्धा त्यांना होम आयसोलेशनचा सल्ला देण्यात आला. यानंतर काल ते फलटणला येऊन होम आयसोलेट झाले होते. प्रशासनाला याची माहिती मिळताच त्यांनी त्यांचे काल स्वॅब घेतले होते. आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत. संबंधितांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असल्याने फलटणचे प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी तातडीने प्रशासन व वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावून कडक उपायोजना करण्याचे आदेश दिले आहे.

Leave a Comment