बस प्रवासात झालेल्या ओळखीचा फायदा घेत महिलेचे ४ महिन्यांचे बाळ पळवले; पुण्यातील धक्कादायक घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे । पुण्यातील हडपसर परिसरातून ४ महिन्याच्या बाळाला पळवून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बस प्रवासात झालेल्या ओळखीचा फायदा घेत आरोपी महिलेने 23 वर्षीय महिलेच्या बाळाला पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. फिर्यादी तरुणीचे नवऱ्यासोबत भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरुन तिने ४ महिन्याच्या बाळाला घेऊन घर सोडले. लोणी गावात राहणारी महिला अहमदनगरला गेली. त्यानंतर तिने नगर ते सातारा बसने प्रवास सुरु केला. त्याचवेळी एक महिला त्यांच्या शेजारी सीटवर येऊन बसली.

काही वेळाने आरोपी महिलेने तक्रारदार तरुणीशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. त्यांच्याशी ओळख वाढवून दोघीही स्वारगेट बस स्थानकात उतरल्या. स्वारगेट बस स्थानकात उतरल्यानंतर या दोघीही हडपसर परिसरात आल्या. तेथील एका चायनीजच्या दुकानात दोघींनी जेवण केले. त्यानंतर आरोपी महिलेने खाऊ आणण्याचा बहाण्याने बाळाला फिर्यादी महिलेकडून स्वतःजवळ घेतले आणि ती तिथून गेली ती परत आलीच नाही.

बराच वेळ झाल्यानंतर फिर्यादी महिलेने आजूबाजूच्या परिसरात त्या महिलेचा शोध घेतला असता ती सापडली नाही. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. हडपसर पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शोध सुरु केला. अद्याप तिचा शोध लागला नसून, पोलिसांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासले जात आहेत. बाळाचा शोध घेण्यासाठी हडपसर पोलिसांनी पथकंही तैनात केली आहेत.(Four months old baby kidnap in Hadapsar Pune)

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment